वादळी पावसाचे तांडव; वीज कोसळून शेतकरी ठार

By Admin | Updated: June 4, 2016 00:41 IST2016-06-03T22:53:42+5:302016-06-04T00:41:56+5:30

दुसऱ्या दिवशीही सर्वदूर रिपरिप : औंधला बंधाऱ्यात पाणी; फलटणला ५१ मिमीची नोंद

Thunderstorms; Electricity collapsed and killed farmers | वादळी पावसाचे तांडव; वीज कोसळून शेतकरी ठार

वादळी पावसाचे तांडव; वीज कोसळून शेतकरी ठार

फलटण/तरडगाव : फलटण शहर व तालुक्यात गुरुवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह पावासाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी कापडगाव हद्दीत शेतातून घरी गुरे घेऊन येत असताना सोमनाथ उत्तम चतुर (वय ४०, रा. कापडगाव) हे वीज अंगावर पडल्याने ठार झाले. गुरुवारी सायंकाळनंतर तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. फलटण शहरात अधिक पाऊस झाला. त्यामुळे फलटण-पंढरपूर रस्त्यावर गोविंद डेअरीजवळ ओढ्याला पाणी आले. परिणामी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
वाई : वाई शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या आगमनामुळे पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.
वाई तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते.
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी सायंकाळी तुरळक तर रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने तासभर हजेरी लावली. हा पाऊस भाताच्या पेरणीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे कास तलावाच्या पातळीत कोणत्याही स्वरूपात वाढ झालेली नाही.
मसूर : मसूर परिसरात विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. किवळ येथे वीज वाहिनीचा धक्का लागून शेळ्यांसह म्हशीचा व कुत्र्याचा मृत्यू झाला. केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे दूरसंचाार विभागाची यंत्रणाही कोलमडली.
मसूर मंडलअधिकारी के. टी. वाघमारे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वाऱ्यामुळे खराडे येथे दोन विजेचे खांब दुसऱ्यांदा जमीनदोस्त झाल्याची घटना घडली.
शेंद्रे : शेंद्रे परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. फांद्या वीजवाहिनीवर पडल्याने सुमारे २० तास वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)

सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळासह झालेल्या या पावसामुळे नुकसानीच्याही घटना घडल्या आहेत. फलटण तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाला. कऱ्हाड तालुक्यात वीज वाहिनीचा धक्का लागून शेळ्यांसह म्हैस मृत्युमुखी पडली. फलटण शहरात सर्वाधिक ५१ मिमी पाऊस झाला. औंध परिसरात ओढे, नाले वाहू लागले. वाई तालुक्यात तर पावसामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. कास परिसरात भात रोपे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस झाला.

Web Title: Thunderstorms; Electricity collapsed and killed farmers