मसूरमधील तीन दुकाने फोडली
By Admin | Updated: January 12, 2015 01:16 IST2015-01-12T01:16:35+5:302015-01-12T01:16:35+5:30
चोरीसत्र सुरूच : ३१ हजारांचा ऐवज लंपास

मसूरमधील तीन दुकाने फोडली
मसूर : येथे चोरट्यांनी पुन्हा शनिवारी मद्यरात्री दोनच्या सुमारास तीन दुकाने फोडून दागिने व रोख रकमेसह ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मसूर-उंब्रज रस्त्यालगत असणारी सदाशिव दादा रामुगडे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानात असलेले जुने कपाट उचकटून त्यातील चार ग्रॅम सोन्याची अंगठी, एक ग्रॅम सोन्याची दोन बदाम, पाच ग्रॅम वजनाची दोन कर्णफुले असा एकूण २० हजारांचा ऐवज व नऊ हजारांची रोख रक्कम असा एकूण २९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कपाटातील तसेच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच मसूर-उंब्रज रस्त्यावरीलच विश्वासराव मानसिंग जगदाळे यांच्या खताच्या दुकानाचे शटर हैड्रोलिक जॅकने उचकटून ९०० रुपयांची रोकड लंपास केली. तसेच जुन्या बसस्थानक चौकातील सुमा हाईटस्मधील दीपक रामचंद्र बर्गे यांचे किडस् शॉपी या दुकानाचे शटर्सचे कुलूप तोडून ८०० रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची खबर सदाशिव रामुगडे यांनी मसूर दूरक्षेत्रात दिली. मसूर पोलीस तपास करत आहेत. (वार्ताहर)