तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांंची उचलबांगडी !--ग्रामस्थांनी मानले ‘लोकमत’चे आभार !
By Admin | Updated: April 12, 2015 23:59 IST2015-04-12T21:20:36+5:302015-04-12T23:59:12+5:30
तारळे आरोग्य केंद्राची झाडाझडती : जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड --लोकमतचा दणका

तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांंची उचलबांगडी !--ग्रामस्थांनी मानले ‘लोकमत’चे आभार !
एकनाथ माळी -तारळे --रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा न पुरवणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, बेशिस्त वर्तन व वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वादविवादाच्या घटना वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या थोपविण्यास अपयश आले. त्यामुळे रुग्णांची फरपट सुरू झाली. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाइकांना अनेक वेळा मरणयातना सोसण्याची वेळ आली. अखेर वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी दवाखान्याला टाळे ठोकले.
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला रात्री ११.३० वाजता दवाखान्यात आणल्यानंतर रात्री मुक्कमी असणाऱ्या आरोग्य सेविका गैरहजर असल्याने नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्याला टाळे ठोकले.या गंभीर घटनेची जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी दखल घेत तातडीने दवाखान्याला भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून रुग्णांच्या नातेवाइकांशी व ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी बेशिस्त वर्तन, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, सेवा न पुरवणे व इतर तक्रारीवरून वैद्यकीय अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली केली. (वार्ताहर)
ग्रामस्थांनी मानले ‘लोकमत’चे आभार !
तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गचाळ कारभार ‘लोकमत’ने वेळोवेळी चव्हाट्यावर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकल्याचा प्रकारही ‘लोकमत’ने सर्वप्रथम सर्वांसमोर आणला. त्यामुळे प्रशासनाला जाग आली. या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी तातडीने आरोग्य केंद्राला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. अखेर आरोग्य केंद्रातील चौघांची बदली करण्यात आली. त्यामुळे रुग्णांची फरपट बंद झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे व ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाने नमते घेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या व रुग्णांना योग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लढ्याला यश आल्यामुळे ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
वादविवादाचा रुग्णांना फटका
तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने प्रसूतीसाठी बहुतांशी महिला येथे दाखल होतात. मात्र, गत दीड ते दोन वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांमध्येच अनेक कारणांनी वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा फटका रुग्णांना बसत होता.