महामार्गावर लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
By Admin | Updated: July 7, 2015 01:04 IST2015-07-07T01:04:15+5:302015-07-07T01:04:15+5:30
पिस्तूल जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

महामार्गावर लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
सातारा : महामार्गावर गाड्या अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सकाळी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून छऱ्याची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
लालासाहेब सतीश येडगे (वय २४, रा. धनगरवाडी, ता. सातारा), प्रतीक बळीराम बाबर (वय २३, रा. सम्राटनगर) आणि समीर अल्ताफ मुलाणी (वय २१, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना या टोळीच्या हालचालींविषयी माहिती मिळाली होती.
त्यानुसार महामार्गावर वाढे फाटा चौकात सापळा रचण्यात आला. या परिसरात गुप्त तळ देऊन तिघांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता आपण वाटमारीचा उद्योग करीत असल्याचे तिघांनी कबूल केले.
या संशयितांकडून छऱ्याच्या पिस्तुलीसह दोन मोबाइल हँडसेट, खटक्याचा चाकू, काळ्या रंगाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी हवालदार विक्रम पिसाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, तानाजी आवारे, हवालदार मोहन घोरपडे,
उत्तम दबडे, रूपेश कारंडे, स्वप्नील शिंदे, विक्रम पिसाळ यांनी कारवाईत भाग घेतला. (प्रतिनिधी)