कंटेनरच्या अपघातात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:38 IST2021-05-10T04:38:56+5:302021-05-10T04:38:56+5:30
उंब्रज : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत भरधाव मालट्रक कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर दुभाजक ...

कंटेनरच्या अपघातात तिघे जखमी
उंब्रज : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत भरधाव मालट्रक कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध रस्त्यावरून येणाऱ्या दुसऱ्या मालट्रक कंटेनरला धडकला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार, ९ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला.
याविषयी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर शिवडे हद्दीतून सातारा ते कऱ्हाड दिशेला भरधाव वेगात जाणारा मालट्रक कंटेनर (एमएच ४३ बीजी १९५२)वरील चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर चढून त्याने कऱ्हाडकडून साताऱ्याकडे निघालेल्या मालट्रक कंटेनर (टीएन ३९ सीझेड ८३४०)ला धडक दिली. या धडकेत कंटेनरचा चालक तर धडक बसलेल्या कंटेनरच्या चालकासह अन्य एकजण असे मिळून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिक, पोलीस, महामार्ग पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी येत मदतकार्याला सुरुवात केली. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. तर अपघातस्थळी मालट्रकच्या धडकेत ऑईल सांडल्याने महामार्ग निसरडा झाला होता. त्यावर पोलिसांनी माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.
फोटो ओळ : ०९ उंब्रज ॲक्सिडेंट
पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. (छाया : अजय जाधव)