ऊसदरासाठी तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’
By Admin | Updated: November 12, 2014 22:55 IST2014-11-12T21:45:59+5:302014-11-12T22:55:43+5:30
कऱ्हाडच्या परिषदेत इशारा : शनिवारपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन

ऊसदरासाठी तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’
कऱ्हाड : ‘उत्पादन खर्च पाहता तीन हजार पाचशे रुपयांच्या आत उसाचा भाव परवडत नाही. हा दर पदरात पाडून घेण्यासाठी दि. १५ तारखेपर्यंत कारखान्यांना ऊस घालू नका. तोपर्यंत सरकारने ऊसदराचा तोडगा काढला नाही, तर आंदोलनासाठी तयार राहा,’ अशी हाक शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
शेतकरी हुतात्मादिनी बुधवारी येथील भेदा चौकात आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मराठावाडा प्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, बिग्रेडिअर सुधीर सावंत, महिला आघाडी प्रमुख वंदनाताई पवार, युवा आघाडीचे शंकर गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विकास मुळीक, नगरचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, परमेश्वर पिसुरे, ऊसतोडणी मुकादम विश्वनाथ पवार, ‘मनसे’चे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष रवींद्र शेलार, विकास पवार, दादा शिंंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांची उपस्थिती होती.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आपला ऊस दि. १५ तारखेपर्यंत तोडू देऊ नये. तोपर्यंत सरकारने ऊसदराबाबत निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. आझाद मैदानावर जमायचे, साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकायचे की, विधानसभेला घेराव घालायचा याबाबतचा निर्णय १५ तारखेनंतर घेतला जाईल. शेतकऱ्यांनी या लढाईसाठी तयार राहावे. मनसे आणि शेतकरी व स्वातंत्र्यसैनिकांची ताकद काय असते, हे आम्ही सरकाराला दाखवून देऊ. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतीमालाची आधारभूत किंंमत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु यावर्षीच्या खरीप व रब्बी हंगामाच्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पाहता शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याचे दिसते.’
ब्रिगेडिअर सुधीर सावंत, रवींद्र शेलार, सयाजीराव देशमुख, कालिदास आपटे, दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, अॅड. विकास पवार, शंकरराव गायकवाड आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
अन्यथा राडा करायला तयार!
सरकारने ऊसदराबाबत समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत उत्पादन खर्चावर आधारित दर देणार असला तरच संघटना उपस्थित राहील; अन्यथा राडा करायला आम्ही तयार आहोत, असा इशारा शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी बोलताना दिला.
तडजोड करणाऱ्यांनाही बडवा !
राजू शेट्टी यांनी तडजोडीचे राजकारण करून शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. या आंदोलनात प्रसंगी त्यांनाही बडवून काढायची भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी. मोदी सरकार हे अतिरेकी सरकार आहे. परदेशी कांदा आयात करून या सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे उद्योग सुरू केले आहेत, असे मत शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी व्यक्त केले.