तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल एक कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:26+5:302021-06-20T04:26:26+5:30

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक ...

Three days of torrential rains caused a loss of Rs 1 crore | तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल एक कोटीचे नुकसान

तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल एक कोटीचे नुकसान

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी उपस्थित होते.

तालुक्यात मे महिन्यात प्रारंभा पासूनच येथे पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु बुधवार, दि. १६ पासून येथे वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारीही येथे पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, दरडीप्रमाणे रस्त्यांच्या कडेला असलेले संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, लहान लहान गटारे, रस्त्यांचे डांबरीकरण यांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी रस्ते तुटून दरीत कोसळले आहेत. दरडी कोळल्यानंतर अनेकवेळा वाहतूक बंद होते. बंद झालेली वाहतूक तातडीने सुरळीत करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी हे तातडीने आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना करतात. वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देतात. रस्ता तातडीने रहदारीसाठी सुरू झाल्यानंतर पुन्हा रस्त्याचे जे नुकसान झाले आहे त्याची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतात, परंतु गेली तीन दिवसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने सार्वजनिक विभागाची चांगलीच धावपळ झाली आहे.

तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी म्हणाले, ‘तापोळा रस्त्यावर वाघेरा फाट्याजवळ मोठी दरड कोसळली. ही दरड रस्त्यावर आली होती. तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तापोळा कोट्रोशी रस्त्याचीही अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. डोंगरावरून मातीचा भराव हा मोरीमध्ये गेल्याने त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्याबरोबर डोंगरातील माती दगड-धोंडे रस्त्यावर येत आहेत. त्यामुळेही रस्त्याचे खूप नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा आहे. रस्त्यावरील मोऱ्या या लहान पडत आहेत. कुंभरोशी, कळमगाव, कोट्रोशी, तापोळा तसेच रेणोशी ते लामज या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच भागातील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्व मिळून साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Three days of torrential rains caused a loss of Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.