पहिली ते आठवीपर्यंतचे साडेतीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:47+5:302021-04-05T04:34:47+5:30
सातारा : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, शनिवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ...

पहिली ते आठवीपर्यंतचे साडेतीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
सातारा : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, शनिवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ६४५ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचा लाभ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही मोबाईल खरेदी, मोबाईलसाठी आवश्यक असणारे नेटवर्क आदी अडचणींमुळे ऑनलाईन अभ्यास करता आला नव्हता. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. तेथे यंदा आकारिक व संकलित चाचण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारे करावे हा देखील प्रश्न होता. मात्र, आता हा प्रश्न निकाली निघाला असून पुढच्या वर्षी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागणार असे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे. परीक्षा रद्द झाल्याने मुले सराव करणार नाहीत, परिणामी मुलांना कोविड वर्षातील अभ्यास पुन्हा नव्याने अभ्यासावा लागणार आहे.
आरटीईनुसार निर्णय आवश्यक
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. तर दुसरीकडे वय वाढल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला खालच्या वर्गात प्रवेश देता येत नाही. वयोगटानुसारच वर्गात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेणे शिक्षण विभागासाठी अपरिहार्य होते, असे जाणकरांनी सांगितले.
पालक म्हणतात
कोट :
अनुत्तीर्ण झाले असते तरी चालले असते. पण मुलांच्या परीक्षा घेणे आवश्यक होते. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांनी नेमका किती व कसा अभ्यास केला हे कळू शकले असते. मात्र, आता परीक्षा होणार नाही.
-रूपेश पिसाळ, पालक
ऑनलाईन वर्गात अनेक अडचणी होत्या. हे खरे असले तरीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला पाहिजे होत्या. यंदा शाळाही झाली नाही व परीक्षाही झाली नाही. त्यामुळे मुलांची वाचनाची सवय मोडेल, याची भीती आहेच.
-सपना दीक्षित, पालक
शिक्षणतज्ज्ञ म्हणतात
आजची कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय अपरिहार्य होता. मात्र, पुढच्या वर्षी जेव्हा वर्ग सुरू होतील तेव्हा यंदा जे काही शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढण्याचा प्रयत्न शासन स्तरावर तसेच शाळास्तरावर होणे आवश्यक आहे.
-मानसिंगराव जगदाळे, सभापती, जिल्हा परिषद शिक्षण समिती सातारा
ऑनलाईन शिक्षण असेल किंवा स्वाध्याय सारखा उपक्रम असेल त्यात अनेक विद्यार्थी सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पुढच्या वर्षी सुरुवातीला मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावर मेहनत घ्यावी लागेल.
-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
जिल्ह्यातील विद्यार्थी
वर्ग विद्यार्थी संख्या
पहिली :३५६८७
दुसरी :२७६५७
तिसरी : २७८६५
चौथी : २३८७९
पाचवी : २८६३२
सहावी : २६८५८
सातवी : २६५१९
आठवी : १७८१९