कऱ्हाड तालुक्यातील ५९ गावांची तहान भागेना!
By Admin | Updated: March 20, 2016 23:24 IST2016-03-20T22:08:27+5:302016-03-20T23:24:19+5:30
टंचाईच्या झळा : घागरभर पाण्यासाठी वणवण; आढावा बैठकांतच अडकल्यात उपाययोजना

कऱ्हाड तालुक्यातील ५९ गावांची तहान भागेना!
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात कृष्णा व कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचबरोबर उपनद्या, विहिरी, तलाव, कूपनलिकांची संख्याही जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत उपलब्ध असूनही यावर्षी तालुक्यातील बहुतांश गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ५९ गावे यापूर्वीच टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर सध्या २१ गावे टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे ही भीषण परिस्थिती उद्भवली असून, प्रशासन पाणी पुरवठ्याऐवजी आढावा बैठका घेऊन चर्चा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसते. कऱ्हाड तालुक्यात १९८ ग्रामपंचायती व २२२ गावे आहेत. त्यापैकी ५९ गावे यापूर्वीच टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर या गावांव्यतरिक्त अन्य २१ गावेही पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. या गावांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोनवेळा पाणीटंचाई आढावा बैठकाही घेण्यात आल्या. त्यात अनेक निर्णय, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याची काम सुरू करण्यात आलेली नाहीत. प्रशासकीय अधिकारी बैठका आणि सूचनांमध्ये वेळ घालवत असल्याचे दिसते. प्रशासनाच्या या कारभाराबाबत शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. ‘प्रशासन काही करेना आणि तालुक्याची तहान भागेना,’ अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कऱ्हाड तालुक्याची लोकसंख्या ५ लाख ८४ हजार ८५ एवढी आहे. तर २२२ गावांचा समावेश तालुक्यात होतो. या गावांतील पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाई, पिकांची उत्पादन क्षमता तसेच गावातील लोकांचे राहणीमान यांचा सर्व्हे प्रशासनाकडून करण्यात आला. त्यातून ५९ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली. मात्र, वास्तविक पाहता सद्य:स्थितीत तालुक्यात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली २२ गावे आहेत. शिवाय उर्वरित वाड्या- वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. टंचाईग्रस्त घोषित केलेल्या गावांपैकी बोटांवर मोजण्याइतक्याच गावांना शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या घोषित टंचाईग्रस्त गावात शेतीचे उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायतीचे संकलित कर देखील भरले गेलेले नाहीत. तर टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे संकलित कर माफ करण्याऐवजी ३१ मार्च अखेर कर भरावेत; अन्यथा ग्रामपंचायतीच्या सुविधा दिल्या जाणार नाहीत, अशा सूचना काही ग्रामपंचायतींतून दिल्या जात आहेत. पीक उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतींचे कर भरलेले नाहीत. त्यामुळे या थकित कराचा बोजा इतर गावांवर पडत आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याऐवजी आढावा बैठकांद्वारे चर्चा केली जात आहे. तालुक्यातील ५० गावांचे पाणी पुरवठ्याबाबतचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. तालुक्यात चार प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना असून, त्यातील तीन सुरू आहेत. या उलट स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची संख्या २७२ आणि लघू नळ पाणीपुरवठा योजना १५० आहेत. गतवर्षी पावसाने दडी मारली होती. वळीव तसेच अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला; मात्र मान्सूनने म्हणावी तेवढी हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला. अनेक गावांना पाण्याची कमतरता भासू लागली. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी भयानक होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) डोक्यावर ऊन : पाण्याअभावी ग्रामस्थांच्या घशाला पडली कोरड यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईतून सुटका मिळविण्यासाठी कडक उन्हात डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशात डोक्यावर ऊन अन् घशाला कोरड अशी ग्रामीण भागाची अवस्था असल्याचे दिसून येत आहे. २१ गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असलेली सध्या तालुक्यातील २१ गावे आहेत. शहापूर, अंतवडी, रिसवड, कोरीवळे, पाडळी हेळगाव, धोंडेवाडी, शामगाव, गोसावेवाडी, तुळसण, वसंतगड, उंडाळे, ओंड, कोळवाडी, कोळेवाडी, शिंदेवाडी, म्होप्रे, अकाईचीवाडी, जिंती, शेळकेवाडी, भुरभुशी, किवळ या गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवत आहे.