हजारो सखींंनी लुटला लावणी महोत्सवाचा आनंद

By Admin | Updated: February 10, 2015 00:27 IST2015-02-09T21:01:17+5:302015-02-10T00:27:32+5:30

शिट्ट्यांचा पाऊस : लावण्यवतींच्या दिलखेचक अदाकारीने जिंकली सर्वांची मने

Thousands of happy people enjoy the lavani festival | हजारो सखींंनी लुटला लावणी महोत्सवाचा आनंद

हजारो सखींंनी लुटला लावणी महोत्सवाचा आनंद

सातारा : अंगावर रोमांच उभा करणारा घुंगरांचा आवाज आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला लावत लावण्यवतींनी आपल्या दिलखेचक अदाकारीने हजारो सखींची मने जिंकून घेतली. मग सखींनीही शिट्ट्या अन् टाळ्यांचा कडकडाटात अस्सल मराठमोळ्या लावण्यांना उत्स्फूर्त दाद देत मनमुराद आनंद लुटला.‘लोकमत सखी मंच’च्या सातारा येथील सभासदांसाठी यावर्षीच्या पहिल्याच कार्यक्रमाची सुरुवात अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना चैत्रालीराजेच्या ‘लावणी महोत्सवा’ने झाली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिजाऊ प्रतिष्ठानच्या सिद्धी पवार, रवींद्र पवार, प्रकृती हेल्थ रेसॉर्टचे सुयोग दांडेकर, नेहा दांडेकर, अनंत ट्रेडिंगच्या हेमलता भोसले, माउली सोफाज्चे अमर अग्रवाल, दीपक अग्रवाल, कास हॉलिडेज्् रिसॉर्टचे संपत जाधव, सारिका जाधव, सुवर्ण स्पर्शचे अजय साबळे, सुर्वेज्चे माधव सुर्वे, इम्प्रेशन ब्युटीपार्लरच्या स्वाती ओक, एसएस एन्टरप्रायजेसचे संतोष भोंगळे, सुमुखी ब्युटी पार्लरच्या संजीवनी कदम, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे, आनंद कृषी पर्यटनचे अभिजित शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती. लावणी महोत्सवाची सुरुवात ‘बाप्पा मोरया रे’ या गीताने करण्यात आली. यानंतर लावण्यवतींनी आपल्या दिलखेचक अदाकारीने सर्वांनाच घायाळ करून टाकले. ‘माझ्या दुधात नाही पाणी’, ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ या गवळणी सादर झाल्यानंंतर ‘या रावजी... बसा भावजी’ या लावणीने चैत्रालीराजेने दमदार एन्ट्री केली आणि तिच्या बहारदार नृत्याने हजारो सखींनी शिट्ट्या अन्् टाळ्यांचा कडकडाटात रुमाल हवेत उडवून एकच जल्लोष केला. यानंतर चैत्रालीराजेने सादर केलेल्या ‘भिंगरी गं भिंगरी’ या लावणीवर सखी मनसोक्त थिरकल्या. या गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळाला. एकापाठोपाठ एक लावण्यांची बरसात होत असताना सखींची वन्स मोअरची बरसात ही सुरू होती.सिद्धी पवार यांनी जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. महिला सबलीकरणासाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या जिजाऊचे तालुक्यात ३९ बचत गट कार्यरत आहेत. महिलांद्वारे केल्या जाणाऱ्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्याचे काम जिजाऊद्वारे केले जाते, असे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावरून प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या ‘जियो फ्रेश’ या एक्सक्लुसिव्ह आयुर्वेद शॉपीची माहिती सखींना देण्यात आली. दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या प्रत्येक समस्येवर ‘जियो फ्रेश’ आयुर्वेद
शॉपीमध्ये अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. सखी मंच सभासदांना
वर्षभर उत्पादनांच्या खरेदीवर दहा टक्के सवलत मिळणार
आहे. ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘नाकी डोळी छान.. रंग गोरा गोरा पान’, ‘ही पोरी साजुक तुपातली’, ‘कारभारी दमानं’, ‘पोरीचा मामला मामाही थांबला’, ‘सोडा राया सोडा हा नादखुळा’ या लावण्यांनी तर सखींना मंत्रमुग्ध करून सोडले. यानंतर सादर झालेल्या ‘शिट्टी वाजली..शाळा सुटली’, ‘झाडाला पिकलाय आंबा’, ‘पप्पी दे पारूला’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’ आणि ‘कामावर जायला उशीर झायला’ या लावण्यांनी काही सखींनी चैत्रालीराजे बरोबरच स्टेजवर येऊन मनसोक्त आनंद लुटला. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल... नका सोडून जाऊ रंग महाल’ या लावणीने या कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)

‘लकी ड्रॉ’च्या मानकरी...
लावणी महोत्सवाच्या मध्यंतरात लकी ड्रॉ काढण्यात आला. याद्वारे माऊली सोफाज् कडून दिल्या जाणाऱ्या २१ हजार रुपये किमतीच्या सोफा सेटच्या मानकरी नंदिता पाटील तर अनंत ट्रेडिंगच्या १८,५०० रुपये किमतीच्या आटाचक्कीच्या मानकरी शीला शिंदे ठरल्या. या व्यतिरिक्त कार्यक्रमात एसएस एन्टरप्रायजेसकडून दिल्या जाणाऱ्या इस्त्रीसाठी दोन ड्रॉ काढण्यात आले. तर दहा भाग्यवान सखींना लकी ड्रॉ द्वारे सुर्वेज्कडून जेवणाचे कूपन देण्यात आले. तीन सखींना आनंद कृषी पर्यटनाची संधी मिळाली तर पाच सखींना इम्प्रेशन ब्युटी पार्लरच्या अ‍ॅडव्हान्स ब्युटी थेरपीज अ‍ॅण्ड ट्रिटमेंटचे कूपन देण्यात आले. तसेच कास हॉलिडेज्कडून एका सखीला सात हजारांचे पॅकेज मोफत देण्यात आले.

Web Title: Thousands of happy people enjoy the lavani festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.