हजारो अपंग मुले एकलव्याच्या भूमिकेत
By Admin | Updated: February 6, 2015 00:44 IST2015-02-05T23:48:58+5:302015-02-06T00:44:25+5:30
पालकांचे आंदोलन :नियमित शिक्षण देण्यासाठी विशेष शिक्षकांची गरज

हजारो अपंग मुले एकलव्याच्या भूमिकेत
सातारा : मुला-मुलींना २००९ च्या कायद्यानुसार मोफत शिक्षणाचा अधिकार मिळाला असतानाही जिल्ह्यातील अपंग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न वाऱ्यावर आहे. समावेषित शिक्षकांमार्फत कर्णबधिर, अंध, अस्थिव्यंग, मतिमंद अशा विविध प्रकारांतील अपंगत्व असणाऱ्या मुलांना आठवड्यातून एकदाच शिकविले जात आहे. या विशेष मुलांचे योग्य शिक्षणपद्धतीअभावी नुकसान होत असल्याने अपंग विद्यार्थी पालक संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कायद्यानुसार मुलांना रोज, नियमित गरजेनरूप व मातृभाषेतून शिक्षण मिळणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील अपंग मुलांना शाळेमध्ये फक्त साहित्य व साधने मिळतात. याच्याशिवाय दुसरं काही मिळत नाही. समावेषित शिक्षणाअंतर्गत आठवड्यातून एकदाच अपंगाचे शिक्षक येतात. मार्गदर्शन करून शिकवून पुढच्या आठवड्यात येतात. तसेच त्यांना इतर कामेही सोपविली जातात. त्यामुळे या काळात आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा पद्धतीचे शिक्षण मिळाल्यास आमच्या मुलांची गुणवत्ता काय राहील?चांगल्या मुलींना रोज शिक्षण. पण, आमच्या अपंग मुलांना आठवड्यातून एकदाच शिक्षण, असा दुजाभाव का?, असा सवाल पालकांनी विचारला आहे.दरम्यान, सामान्य शिक्षकाने अंध, मूकबधिर, मतिमंद, स्वमग्न, बहुविकलांग मुलांना शिकविलेले काहीच कळत नाही. ते स्वत: म्हणतात की, अशा अपंग मुलांना शिकवायला अपंगांचे विशेष शिक्षण घेतलेले शिक्षक पाहिजे. या चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे अपंग मुलांचे नुकसान होत आहे. या आंदोलनात समावेषित विशेष शिक्षकही सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळीच प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ७ हजार ६४ अपंग मुले
सातारा जिल्ह्यात एकूण ७ हजार ६४ अपंग मुले आहेत. एका सर्व्हेनुसार कमी दृष्टी : १०३६, अर्ध दृष्टी : २६३, कर्णबधिर : ६४०, वाचादोष : ४९७, अस्थिव्यंग : ८८७, मतिमंद : १८९३, बहुविकलांग : ४६७, मेंदूचा पक्षाघात : ५४, अध्ययन अक्षम : १२७४, स्वमग्न : ५३ इतकी अपंग मुले योग्य शिक्षणापासून वंचित असल्याचे पालकांचे मत आहे.
पालकांच्या मागण्या
अपंग विद्यार्थ्यांना रोज व नियमित विशेष शिक्षण मिळावे
त्यांना विशेष शिक्षणाचा स्वतंत्र विभाग असावा
अपंग शिक्षणातील पदवी शिक्षकांची नियुक्ती करावी
कर्णबधिर विद्यार्थ्यांना खुणांच्या भाषेतून शिक्षणाची व्यवस्था करावी
अपंगांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा