टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळी भागात थारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:39+5:302021-09-11T04:41:39+5:30
सातारा कोरोना महामारी असो वा अतिवृष्टी; अगदी पुनर्वसनाचे प्रश्न असोत; त्यावेळी शशिकांत वाईकर आणि मंडळी कुठे होते? परळी भागात ...

टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळी भागात थारा नाही
सातारा
कोरोना महामारी असो वा अतिवृष्टी; अगदी पुनर्वसनाचे प्रश्न असोत; त्यावेळी शशिकांत वाईकर आणि मंडळी कुठे होते? परळी भागात त्यांनी आजवर कोणते सामाजिक कार्य केले आहे? केवळ टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नाही. अशा ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे याचा विचार पक्षाने करावा, असे मत सातारा पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव यांनी व्यक्त केले.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ठेकेदार असलेल्या शशिकांत वाईकर आणि मंडळींनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विकासाचे नव्हे तर, संधिसाधू राजकारण केले आहे. ज्यांनी आजवर परळी भागाच्या विकासासाठी एक दमडीही खर्च केली नाही, परळी भागातील लोकांसाठी कुठेही, कधीही उभे राहिले नाहीत. कोरोना, अतिवृष्टी, पुनर्वसन, आदी कोणत्याही सामाजिक प्रश्नावर कवडीचेही काम केले नाही, अशा मंडळींनी केवळ टेंडर मिळण्याच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावेळी परळी भागातील लोक कोरोना, अतिवृष्टी, आदी समस्यांनी त्रस्त होते त्यावेळी ही मंडळी कुठे होती, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पूर्वी उमेदवारी मिळाली नाही; पण आता मिळावी या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि त्यातून टेंडर मिळावीत या स्वार्थी हेतूने वाईकर आणि मंडळींचा खटाटोप सुरू आहे. अशा स्वार्थी लोकांना परळी भाग कधीही थारा देणार नाही. त्यामुळे अशा लोकांना पक्षात का घ्यायचं याचा पक्षाने गांभीर्याने विचार करावा, असेही जाधव यांनी म्हटले आहे.