ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान
By Admin | Updated: April 1, 2016 01:51 IST2016-04-01T01:50:25+5:302016-04-01T01:51:09+5:30
कवठे केंजळ पाणीयोजना : मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान
कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागातील भीषण दुष्काळी परिस्थितीतील जनतेला एकमेव आशादायी असलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेच्या किकलीकडे जात असलेल्या बंदिस्त पाईपलाईनची कवठे पर्यंतची पाईपलाईन पूर्ण करून कवठे येथील चंद्रभागा ओढ्यात पाणी सोडण्याची चाचणी आज पूर्ण झाल्याने ऐन दुष्काळात टंचाईग्रस्तांची तहान भागविली आहे.
कवठे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने कवठे व बोपेगाव तसेच खानापूर या परीसरातील ओढे जलमय झाले. या पाईपलाईनच्या क्षेत्रात येणा-या सर्व ओढ्यांवर पाईपलाईनमधून व्हॉल्व काढून पाणी सोडण्यात आल्याने सर्व ओढ्यावरील बंधारे भरून वाहू लागले . केंजळ येथे जात असलेल्या पाईपलाईनच्या दुस-या फाट्याने केंजळ व सुरूर या ओढ्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागावर घोंगावत असलेल्या पाणी टंचाईचे संकट काही अंशी कमी होण्यास मदत झाली आहे.
कवठे केंजळ योजनेच्या टाकीतून तीन पाईपलाईन जात असून त्यातील पहिला फाटा परखंदी येथे, दुसरा फाटा केंजळ येथे तर तिसरा फाटा कवठे येथून किकली या गावाकडे जाणारा आहे. यातील परखंदी व केंजळ या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु महिनाभराचे कॅनालचे आवर्तन असतानासुद्धा केंजळ येथून सुरूर व कवठे गावापर्यंत येणारे पाणी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कवठे येथे पोहोचू शकत नव्हते यावर पयार्यी मार्ग काढण्यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कवठे येथून किकलीकडे जात असलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले व कवठे, बोपेगाव, खानापूर ग्रामस्थ यांनी अहोरात्र सहकार्य करीत कॅनालचे आवर्तन संपण्यापूर्वी काम पूर्ण केल्याने या पाणी वाहू शकले. यामुळे वाई तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)
लोकांचे सांघिक श्रमदान
जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील अहोरात्र सदर योजनेवर लक्ष ठेवून होते व वारंवार या योजनेच्या कामावर प्रत्यक्ष थांबून योजेनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत असल्याने परिसरातील सर्वच ग्रामस्थ योजनेच्या ठिकाणी रात्रंदिवस उपस्थित राहून यथाशक्ती काम करण्यासाठी स्वत:कडील यंत्रसामुग्रीसह विना मोबदला श्रमदान करून योजनेवरील इंजिनीअर व कामगारांना सहकार्य करीत होते.
वीस वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहू लागला चंद्रभागा ओढा
चंद्रभागा ओढ्याला पूर येवून गेला कि परिसरातील विहिरी तुडुंब भरणार व वर्षभर पाणी शेतीसाठी पुरणार हे येथील शेतक-यांनी मांडलेले गणित गेले वीस वर्षे हा ओढा पूर्ण क्षमतेने भरून न वाहिल्याने फोल ठरत होते. वीस वर्षाच्या कालावधीनंतर महापूर यावा या पद्धतीने सदर ओढा पहिल्यांदाच भरल्याचे पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होते