चोर सोडून सन्याशाला फाशी !

By Admin | Updated: February 9, 2015 00:41 IST2015-02-08T23:55:43+5:302015-02-09T00:41:37+5:30

‘महसूल’चा अजब कारभार : देवापूरच्या शेतकऱ्याला वाळूचोर ठरवून केला १९ लाखांचा दंड

Thieves leaving hanging to death! | चोर सोडून सन्याशाला फाशी !

चोर सोडून सन्याशाला फाशी !

म्हसवड : देवापूर, ता. माण येथील शेतकऱ्याला अनधिकृत गौणखनिज उत्खननप्रकरणी महसूल विभागाने १८ लाख ५५ हजार रुपयांचा दंड केला आहे. दंड न भरल्यास मालमत्तेचे समपहरण करून रक्कम वसूल करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. वाळूउपसा प्रकरणाशी काडीचा संबंध नसताना केवळ नदीकाठी जमीन आहे म्हणून एका गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महसूल विभागाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
देवापूर येथील विठोबा बाबर यांची ओढ्यालगत वीस गुंठे जमीन आहे. ओढ्यातून वाळूचोरी असल्याने याबाबत वारंवार तलाठ्यांना सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उलट तलाठ्याने तक्रारदार शेतकऱ्यानेच वाळू उत्खनन केल्याप्रकरणी आपण दंडास पात्र असल्याने बाजारभावाप्रमाणे तिप्पट दंड का आकारू नये, याबाबत लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडावे, अशी नोटीस बजावली आहे.
याबाबत संबंधित विठोबा बाबर यांनी तहसीलदारांकडे आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, माझ्या जमिनीचा गट नं. २७५ असून हा पंचनामा माझ्या जमिनीशेजारील इरिगेशन क्षेत्रात झाला असून माझ्या जमिनीशी काहीही संबंध नाही. तरीही मला नाहक त्रास दिला जात आहे. त्यानंतर महसूल विभागाने १४ लाख ८४ हजारांची दुसरी नोटीस दिली. त्यानंतर तिसरी नोटीस घेण्यास नकार दिला म्हणून दारावर चिकटवून दंड देण्यास तुम्ही कसूर केली, त्यामुळे एकूण १८ लाख ५५ हजार रुपये देण्यास तुम्ही पात्र आहात. दंड न भरल्यास मालमत्तेचे समपहरण करून रक्कम वसूल करण्यात येईल.
नोटीस पाहिल्यानंतर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्यामुळे विठोबा बाबर हे शेतकरी हबकून गेले आहेत. ओढ्यातील वाळूचोरी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना महसूल खात्याने लाखो रुपयांचा दंड ठोठावल्याने बाबर कुटुंब उघड्यावर आले आहे. (प्रतिनिधी)

पाटबंधारे खात्याच्या जमीन हद्दीत वाळूचोरी झाली आहे. त्याचा पंचनामा झाला असून त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही. महसूल खाते माझ्या मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा.
- विठोबा बाबर, शेतकरी, देवापूर

Web Title: Thieves leaving hanging to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.