Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं
By प्रमोद सुकरे | Updated: February 1, 2025 13:29 IST2025-02-01T13:28:43+5:302025-02-01T13:29:10+5:30
कऱ्हाड : सातारच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा नव्हतीच मुळी. ती कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी कुठलेही लॉबिंग, ...

Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं
कऱ्हाड : सातारच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा नव्हतीच मुळी. ती कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी कुठलेही लॉबिंग, विशेष प्रयत्न केले नव्हते. टीव्हीवर बातम्या आल्यावरच मला सातारचा पालकमंत्री झाल्याचे कळाले. आणि मी पहिल्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो आहे. त्यामुळे पालकमंत्री झाल्यात काही विशेष वाटत नाही. आता जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे मत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडात निवडक माध्यम प्रतिनिधींशी औपचारिक बोलताना व्यक्त केले.
पालकमंत्री झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आपल्याला भेटले का? याबाबत छेडले असता होय, परवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी त्यांची व माझी भेट झाली. त्यांनी पुष्पगुच्छ देत मला शुभेच्छाही दिल्या आहेत. मी ही त्यांना पालकमंत्री म्हणून काम करत असताना तुमच्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची मला गरज आहे. तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात काम करणार आहोत असे सांगितले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तुमच्या निवडीनंतर साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका महिला संचालकांनी माध्यमांतून उघड नाराजी व्यक्त केली होती. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्रीपद दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती.प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता मंत्री देसाई यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्या जिल्ह्याला माहिती झाल्या. अशी खोचक टिप्पणी करणे पसंत केले.
ठाण्याचे पालकमंत्रीपद सांभाळणे तेवढे सोपे नव्हते, मात्र..
ठाण्याचा पालकमंत्री होतो. पण ठाण्याचे पालकमंत्रीपद सांभाळणे तेवढे सोपे नव्हते. मात्र आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला पात्र राहून, सर्वांना बरोबर घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले याचे समाधान वाटते.असेही मंत्री देसाईंनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी सूचना करतो - मंत्री देसाई
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.त्यावेळी डी पी जैन कंपनीचे प्रमुख काही दिवसांपूर्वी मुंबईला मला भेटायला आले होते. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. पण आता त्यांना बोलावून घेऊन या कामाला गती देण्यासाठी सूचना करतो असेही मंत्री देसाईंनी सांगितले.