गावातून हद्दपार होता-होता गुटखा झाला केवळ महाग!
By Admin | Updated: May 31, 2014 00:32 IST2014-05-31T00:32:07+5:302014-05-31T00:32:24+5:30
परराज्यांतून चोरटी वाहतूक : ग्रामीण भागात चढ्या दराने विक्री

गावातून हद्दपार होता-होता गुटखा झाला केवळ महाग!
सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की विविध व्यसनामुळे दररोज हजारो संसार डोळ्यादेखत उद््ध्वस्त होत असताना शासन व लोकप्रतिनिधी गावागावांत दारुबंदी करण्याबरोबरच गुटख्यावर बंदी आणल्याच्या वल्गना करीत आहेत. वस्तुत: ग्रामीण भागात तरुणवर्गाची व्यसनाधीनता दररोज वाढतच असल्याचे चित्र दिसत असून, तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. सातारा जिल्हयाच्या ग्रामीण भागात वेळ घालवण्यासाठी शेतकरी, मेंढपाळ व अन्य ग्रामस्थ तंबाखू खात असत तर महिलावर्ग तंबाखू भाजून त्याची मिसरी दात घासण्यासाठी वापरत असत. पंरतु तंबाखूपासून गुटखा, पानमसाला आदी पदार्थ बनू लागल्यामुळे वेळ घालवण्यासाठी खाल्ल्या जाणार्या तंबाखूने तरुणवर्गाला व्यसनाधीन बनवून टाकले. गुटखा, मावा, पानमसाला ही तरुणांची फॅशन झाली. त्यामुळे हजारो संसार उद््ध्वस्त होऊ लागले. या परिस्थितीवर उपाय म्हणून शासनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर मर्यादा घालून गुटख्यावर बंदी घातली आहे. पंरतु बाहेरच्या राज्यातून तंबाखूजन्य पदार्थाची चोरटी वाहतूक होऊन ग्रामीण भागात त्याची सर्रास विक्री होत आहे. बंदीमुळे लपूनछपून ही विक्री करण्यात येत असून, त्यासाठी शौकीन मंडळींना चढ्या भावाने गुटखा खरेदी करावा लागत आहे. ग्रामीण भागात व्यक्तींचे लहानमोठ्या व्यसनांसाठीचेही ‘बजेट’ ठरलेले असते. गुटखा आणि बंदी घातलेले अन्य तंबाखूजन्य पदार्थ बंद तर झालेच नाहीत; उलट त्यांची दरवाढ झाली. परिणामी तरुणवर्ग घरात भांडण करून व्यसनासाठी पैसे मागताना दिसत आहे. पैसे नसल्यास चोरी, भंगारविक्री, वस्तूंची विक्री असेही प्रकार घडताना दिसत आहेत. ग्रामीण भागात दोन रुपयांचा गुटखा सध्या सहा रुपंयाना मिळत असून, मावा खरेदी करण्यासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. ‘निकोटिन’ या तंबाखूतील विषारी पदार्थाची सवय शरीराला लागल्यानंतर मावा-गुटखा मिळविण्यासाठी वाट्टेल ते करायला तरुणवर्ग तयार असल्याचे दिसत आहे. गुटखा व माव्याची छुप्या मार्गाने विक्री होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि राजकीय नेते, गुंडगिरी करण्यार्यांची पिलावळच गुटख्याची विक्री करत असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असून, हजारो संसार उद््ध्वस्त होत आहेत.