पालकमंत्री व्हावं असं मला वाटून उपयोग नाही, वरिष्ठ घेतील तो निर्णय मला मान्य- मकरंद पाटील
By प्रमोद सुकरे | Updated: December 26, 2024 13:49 IST2024-12-26T13:48:37+5:302024-12-26T13:49:45+5:30
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला ४ कॅबिनेट मंत्रीपदे हा महायुतीने केलेला मोठा सन्मान, अशीही व्यक्त केली भावना

पालकमंत्री व्हावं असं मला वाटून उपयोग नाही, वरिष्ठ घेतील तो निर्णय मला मान्य- मकरंद पाटील
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला एकाच वेळी ४ कॅबिनेट मंत्रीपदे देऊन महायुतीने जिल्ह्याचा खूप मोठा सन्मान केला आहे.आम्हा चौघांनी चांगली खाती दिली आहेत. पण आता सातारचा पालकमंत्री व्हावं असं मला वाटून उपयोग नाही. याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील अन ते जो निर्णय घेतील तो मला निश्चितपणे मान्य असेल असे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मकरंद पाटील प्रथमच कराड दौऱ्यावर आले होते त्यांचे कराडात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले त्यावेळी ते माध्यमांची मदत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील( वाठारकर),माजी आमदार आनंदराव पाटील, नितीन भरगुडे - पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, माजी नगरसेवक सादिक इनामदार, विजय यादव, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र डुबल,यशवंत जाधव,संजय देसाई आदींची उपस्थिती होती.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले,राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर मतदारसंघातील लोकांना मी मंत्री व्हावे असे वाटत होते. आमचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिल्याने मतदार संघातील लोकांबरोबरच जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांना आनंद झाला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला वेगळी दिशा व विचार दिले आहेत. आम्ही त्याच वाटेवरून जात आहोत. म्हणून तर आज कराडला दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून आलो आहे. येथून मिळालेली प्रेरणा मला निश्चितच कायम फायदेशीर ठरली आहे.
अजून विचार केलेला नाही!
ज्येष्ठ नेते शरद पवार व तुमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आता मंत्री झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणार आहात काय? याबाबत विचारले असता अजून तसा काही विचार केलेला नाही असे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
त्यांना काय अनुभव आला त्यांना माहित...
शरद पवार यांनी दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केल्याची भावना तुमचे मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. याबाबत छेडले असतात त्यांना शरद पवारांचा काय अनुभव आला हे त्यांना माहिती. मी त्यावर काय बोलणार असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.
मलाही वाटतेय राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढू. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होईल असे म्हटले आहे. याबाबत छेडले असता त्यांना तसे वाटले तर वावगं काही नाही. पण मलाही वाटतंय जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा असे मिश्कील उत्तर मंत्री पाटील यांनी दिले.