वडगाव पोतनीस येथे शिवपार्वती मूर्तीची चोरी
By Admin | Updated: August 17, 2014 22:50 IST2014-08-17T22:49:03+5:302014-08-17T22:50:41+5:30
पेशवेकालीन मूर्ती : परिसरात खळबळ

वडगाव पोतनीस येथे शिवपार्वती मूर्तीची चोरी
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील वडगाव पोतनीस येथील मंदिरातून पेशवेकालीन शिवपार्वतीची मूर्ती चोरीस गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मूर्तीची किंमत लाखांत असल्याचा दावा तेथील ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळजवळ असलेल्या वडगाव पोतनीस या गावाला पेशवेकालीन इतिहास आहे. याठिकाणी पेशवेकालीन साधारणत: दहा ते बारा मोठी व इतर लहान मंदिरे आहेत. त्यांपैकी गावातील चामुंडादेवीच्या मंदिरात पूजेसाठी पुजारी आहे. इतर ठिकाणी ग्रामस्थच पूजा करतात. येथे प्राचीन मंदिरे असल्याने याठिकाणी दररोज भाविक भेट देत असतात. दरम्यान, शनिवारी (दि. १६) रात्री जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील महादेवाच्या मंदिरातील पुरातन हाताने कोरलेली संगमरवरी शिवपार्वतीची मूर्ती व त्यामध्ये गणेश, कार्तिकस्वामी यांच्या अंदाजे साडेतीन फुटांची मूर्ती चोरून नेली. या मूर्ती वजनाने जड असल्याने ही चोरी एका व्यक्तीने केली नसून, त्यामध्ये टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मूर्तीच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने नसतानाही चोरट्यांचा मूर्ती चोरण्यात रस का? यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.ही मूर्ती गाभाऱ्यात असते; मात्र श्रावण महिना असल्याने भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या गाभाऱ्यास कुलूप लावले होते. चोरीची माहिती समजताच ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी केली होती. सरपंच शिवाजी पवार यांनी याची फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार चंद्रकांत निकम तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
इतर मूर्तीही उखडण्याचा प्रयत्न
महादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदीबैल व रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शंकराच्या मंदिरातील शिवलिंग, नंदीच्या मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती नेत असताना ती भंगली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
लाखो रुपये किंमतीची मूर्ती
या मूर्तीची शासकीय किंमत तीस हजार रुपये होत असली, तरी या मूर्ती पेशवेकालीन असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची किंमत लाखांत आहे, असा ग्रामस्थांचा दावा असून, चोरट्यांचा तत्काळ छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.