सातारा : सातारा शहरातील गोडोलीमध्ये दीड महिने बंद असणाऱ्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील रंगराव पाटील (रा. यशोदानगर, गोडोली सातारा. मूळ रा. कोल्हापूर जिल्हा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार सुनील पाटील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे गोडोलीत अपार्टमेंटमध्ये घर आहे. त्यांच्या बंद घरात २० जून ते ९ आॅगस्टदरम्यान चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप आणि कडी तोडून घरात प्रवेश केला.यावेळी २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन, १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ३० ग्रॅम वजनाचा एक राणीहार, २० ग्रॅम वजनाची एक माेहनमाळ, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चार वेढणी, १० ग्रॅम वजानाचे कानातील चार टाॅप, १० ग्रॅम वजनाचा नेकलेस, २२.५ ग्रॅम वजानाचा सोन्याचा हार तसेच चांदीचा कलश, समई, ताम्हण, चांदीची वाटी, फूलपात्र, करंडा असा ऐवज नेला. याची आजच्या बाजारभावाप्रमाणे पाच लाखांहून अधिक किंमत आहे. तर तक्रारदार घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला आहे. तसेच पोलिसांनी चोरीच्या ठिकाणीही जाऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोरे हे तपास करीत आहेत.
दीड महिना घर बंद; चोरट्यांचा पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला, साताऱ्यातील घटना
By नितीन काळेल | Updated: August 11, 2023 13:04 IST