वाई-वाठार रस्त्यावरील शंभर सागाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST2021-05-25T04:43:10+5:302021-05-25T04:43:10+5:30
वाई : वाई-वाठार या मुख्य रस्त्यावर शांतीनगर परिसरात असणाऱ्या धनंजय कारळे यांच्या शेतातील बांधावर तीन वर्षांपूर्वी लावलेली सागवानाची शंभर ...

वाई-वाठार रस्त्यावरील शंभर सागाच्या झाडांची चोरी
वाई : वाई-वाठार या मुख्य रस्त्यावर शांतीनगर परिसरात असणाऱ्या धनंजय कारळे यांच्या शेतातील बांधावर तीन वर्षांपूर्वी लावलेली सागवानाची शंभर झाडे शुक्रवारी रात्री दहानंतर चोरट्यांनी कुऱ्हाडीने तोडून नेऊन पोबारा केला, अशी तक्रार धनंजय कारळे यांनी स्वतः वाई पोलीस ठाण्यात व वन विभागात दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कारळे यांच्या शेतात गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या बांधावर सागाची झाडे लावलेली होती. त्यांची उंची आठ फुटांपर्यंत वाढलेली असल्याने त्यांचा उपयोग घराच्या बांधकामासाठी करण्यात येऊ शकतो, या उद्देशाने ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे; तसेच सागाच्या लाकडाला बाजारात चांगलीच किंमत मिळत असल्याने अज्ञातांनी झाडांवर डल्ला मारला आहे. कारळे यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळ वाऱ्यानंतर या परिसरात विहिरीवरील मोटारी, लाईटच्या वायरी, शेतातील साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजता कारळे शेतातून घरी आल्यानंतर या झाडांची चोरीची घटना घडलेली आहे. जंगलातील सागाच्या झाडांवर नेहमीच चोरटे डल्ला मारत असतात, अशा तक्रारी वन विभागात दाखल करण्यात आल्या आहेत, तरी चोरट्यांचा त्वरित शोध घेऊन कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.