सातारा : गोळीबारातून वाचलेले दोघेजण एका गुन्ह्यातील संशयित आरोपी आहेत. ‘त्या’ दोघांचा कोणत्याही परिस्थितीत जीव घ्यायचाच, असं ठरवून पाचजणांनी कट रचला. न्यायालयातील तारखेला हजर राहून दोघे दुचाकीवरून घरी यायला निघाले. याचवेळी तिघेजण कारमधून तर गोळीबार करणारे दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते. संधी मिळताच त्यांच्यावर गोळीही झाडली. पण नेम चुकला अन् मोठा अनर्थ टळला.अमर पवार (वय २१, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), श्रेयस भोसले (वय २१, रा. तामजाईनगर, सातारा) हे दोघे सोमवारी दुपारी मेढ्याहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी संशयितांनी अमर आणि श्रेयसवर गोळीबार केला. यात अमर याच्या पायाच्या पोटरीला गोळी लागली तर श्रेयसच्या कमरेला गोळी चाटून गेली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या काही तासांत तुषार प्रल्हाद धोत्रे (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला अटक केली. धोत्रे याच्यावर यापूर्वी खून, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर हा कट कसा शिजला याचा उलगडा झाला. महिनाभरापूर्वी अमर पवार आणि श्रेयस भोसले या दोघांनी हल्लेखोर संशयितांना कास येथे बारबालांच्या डान्सवरून जबर मारहाण केली होती. या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या दोघांवर मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी तुषार धोत्रे याच्यासह अन्य पाचजणांनी अमर आणि श्रेयस या दोघांच्या खुनाचा कट रचला. ठरल्याप्रमाणे तिघेजण कारमध्ये बसले. मेढ्यापासून कारमधून संशयितांनी अमर आणि श्रेयसचा पाठलाग सुरू केला. तर त्यांचे सहकारी दोघे संशयित कोंडवे येथे वाटेत थांबले होते. कारमध्ये बसलेला संशयित तुषार धोत्रे व अन्य दोघे दुचाकीवर असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना अमर आणि श्रेयसचे लोकेशन सांगत होते. अमर आणि श्रेयस हे दोघे कोंडवेजवळील एका पेट्रोलपंपाजवळ येताच दोघांवर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यातून दोघेही बालंबाल बचावले. दरम्यान, तुषार धोत्रे याला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिलिसांची पथके रवानागोळीबार करणारे दोघे तसेच या कटात सहभागी असलेले आणखी दोघे फरार आहेत. चा चाैघांच्या शोधासाठी सातारा तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची टीमही पुणे, कोल्हापूर, सांगली येथे रवाना झाली आहे.