साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला
By सचिन काकडे | Updated: August 18, 2023 15:37 IST2023-08-18T15:36:49+5:302023-08-18T15:37:51+5:30
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला

साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला
सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथे राहणाऱ्या अस्मिता कुलकर्णी (वय ६५) या महिलेवर भटक्या श्वानांनी हल्ला केला. श्वानांना हुसकावून लावताना रस्त्यावर आदळल्याने त्यांना दुखापतही झाली. परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
अस्मिता कुलकर्णी बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या दिशेने चालत निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. काही अंतर पुढे गेल्यानंतर एकापाठोपाठ एक सात ते आठ श्वानांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातातील बॅगेने श्वानांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत असताना त्या रस्त्यावर आदळल्या. यामध्ये त्यांना दुखापतही झाली.
महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दगड, वीटांचे तुकडे श्वानांच्या दिशेने भिरकावून त्यांना हुसकावून लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून, पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी अस्मिता कुलकर्णी यांनी केली आहे.