कऱ्हाड : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक येत्या ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करणे, छाननी, माघारी आणि चिन्ह वाटप हे सगळे सोपस्कार पूर्ण झाले असले तरी एका पॅनेलचे प्रमुख निवास थोरात यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीचा फैसला अजूनही बाकी आहे. मंगळवार, दि. २५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी झाली खरी मात्र न्यायालयाने पुन्हा बुधवार दि.२६ तारीख दिल्याने या प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तब्बल २५१ जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर २०५ अर्ज उरले होते. पण अवैध झालेल्या उमेदवारांपैकी १० जणांनी प्रादेशिक संचालक पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्यात १० पैकी ९ जणांचे अर्ज पुन्हा वैद्य करण्यात आले. पैकी निवास थोरात यांचा एक अर्ज वैध झाला होता. पण त्यांच्या अर्चावर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हरकतदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई चर्चेची बनली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने पहिली तारीख शुक्रवार दि.२१ या दिवशी दिली होती. पण त्या दिवशी निवास थोरात हजर न राहिल्याने मंगळवार दि.२५ ही पुढची तारीख देण्यात आली होती. मंगळवारी उच्च न्यायालयात निवास थोरात यांच्या वकिलांनी आपले म्हणणे सादर केले. पण न्यायालयाने पुन्हा बुधवार दि. २६ तारीख दिल्याने न्यायालय नेमका काय निर्णय घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
सह्याद्री कारखान्यात यावेळी तीन पॅनलमध्ये लढत होत आहे. पैकी सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनल रिंगणात आहे. तर त्या विरोधात भाजपचे आ. मनोज घोरपडे यांचे दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचे दिवंगत यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहेत. पण निवास थोरात यांच्याच अर्जावरील हरकतींच्या सुनावणीमुळे त्यांच्या समर्थकांत धाकधूक कायम आहे.