उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा
By नितीन काळेल | Updated: April 30, 2025 21:03 IST2025-04-30T21:03:16+5:302025-04-30T21:03:42+5:30
सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे.

उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून सातारा शहराचा पारा तीन दिवसांपासून ४०.७ अंशावर स्थिर आहे. यामुळे नागरिक ऊन आणि उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे.
सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. मागील काही वर्षांची तुलना करता यंदाचा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरला आहे. कारण, सतत पारा वाढलेला आहे. सातारा शहर हे पश्चिम भागात असलेतरी पारा कायमच ४० अंशावर राहिला आहे. त्यातच मागील तीन दिवस तापमान ४०.७ अंश नोंद होत गेले. यामुळे सातारकरांना उन्हाळी झळांशी सामना करावा लागतोय. तसेच घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तर रात्रीही उकाड्यामुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.
पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. परिणामी दुपारी दोन ते चार या वेळेत उन्हाचा कहर असतो. समोर पाहिले तरी रखरखत्या उन्हामुळे डोळ्यांना त्रास होत आहे. घराबाहेर पडणेही अवघड होऊन गेलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर या उन्हाचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यातही पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळे सातारा शहराचा पारा ४१ अंशावर जाऊ शकतो.