साताऱ्यात नागरिकांवर हल्ले करणारे माकड अखेर जेरबंद, वनविभागाच्या टीमने माकडाला सुरक्षित अधिवासात सोडले
By प्रगती पाटील | Updated: February 24, 2024 15:30 IST2024-02-24T15:29:01+5:302024-02-24T15:30:02+5:30
सातारा : गेल्या काही दिवसांपासून शाहूपुरी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी, खटावकर कॉलनी, धर्मवीर संभाजीनगरसह संपूर्ण परिसरात घबराट निर्माण करणाऱ्या ...

साताऱ्यात नागरिकांवर हल्ले करणारे माकड अखेर जेरबंद, वनविभागाच्या टीमने माकडाला सुरक्षित अधिवासात सोडले
सातारा : गेल्या काही दिवसांपासून शाहूपुरी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी, खटावकर कॉलनी, धर्मवीर संभाजीनगरसह संपूर्ण परिसरात घबराट निर्माण करणाऱ्या माकडांच्या टोळीतील एका माकडास जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टिमला यश आले. या माकडाला सुरक्षित अधिवासात सोडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शाहूपुरी येथे काही दिवसांपूर्वी एका अपघातात माकडाच्या पिल्लाला रिक्षाने ठोकरले. त्यानंतर या परिसरात बहुतांश प्रवासी रिक्षावर माकड हल्ला करत असल्याचे नागरिकांनी पाहिले. माकडाच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने त्याला जेरबंद करण्याची आग्रही मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, यशवंतनगर येथे कचरा संकलन करणाऱ्या नगरपालिका ट्रॅक्टरवर हे माकड बराच वेळ बसून राहिले होते, ही माहिती संबंधित यंत्रणेला मिळताच त्यांनी धाव घेतली असता सर्वोदय कॉलनी रस्त्यावर त्याला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात रेस्क्यू टिमला यश आले. विशेष म्हणजे तक्रार केल्यापासून वनविभागाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवस स्थानिकांना त्रास देणारे माकडे जेरबंद केल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. या माकडांनी हल्ल्यात स्थानिकांनाही गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माकड जेरबंद झाल्यामुळे तणाव विरहीत वावर करण्याला संधी मिळाली. - शोभा केंडे, स्थानिक