साताऱ्यात पाऊस, फुलांच्या वर्षावात बाप्पा विराजमान!, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका
By सचिन काकडे | Updated: September 19, 2023 13:46 IST2023-09-19T13:44:34+5:302023-09-19T13:46:36+5:30
'मोह नको.. अहंकार नको..नको कपडे छान, दरवर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान' असे साकडेही बाप्पांना घातले

साताऱ्यात पाऊस, फुलांच्या वर्षावात बाप्पा विराजमान!, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका
सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक, फुलांचा वर्षाव, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् 'बाप्पा मोरया'चा जयघोष, अशा मंगलमय वातावरणात सातारा शहरात मंगळवारी विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भक्तांनी 'मोह नको.. अहंकार नको..नको कपडे छान, दरवर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान' असे साकडेही बाप्पांना घातले.
गणेश आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठ विविधरंगी वस्तूंनी सजून गेली होती. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जो-तो लाडक्या बाप्पांची आतुरतेने वाट पाहत होता. ही आतुरता मंगळवारी संपली अन् सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले. सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच वाजत-गाजत बाप्पांचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी राजपथावर नागरिकांची गर्दी लोटली होती. गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला वरुणराजाने हजेरी लावली. तरीदेखील भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.