कड्याची ‘दगडफेक’ भिंतीवर झेलणार!--‘लोकमत’चा दणका...
By Admin | Updated: August 1, 2014 23:20 IST2014-08-01T22:03:34+5:302014-08-01T23:20:20+5:30
काळोशीची पाहणी : तहसीलदारांकडून विविध उपायांवर विचार; ग्रामसभेनंतर ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

कड्याची ‘दगडफेक’ भिंतीवर झेलणार!--‘लोकमत’चा दणका...
परळी : सुटलेल्या कड्याखाली धोकादायक स्थितीत राहणाऱ्या काळोशी या परळी खोऱ्यातील गावाची तहसीलदारांनी शुक्रवारी पाहणी केली. सातत्याने कोसळणारे छोटे-मोठे दगड रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. धोका टाळणाऱ्या अन्य उपायांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येणार असून, त्यानंतर ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
दुर्घटनाग्रस्त ‘माळीण’सारखी काही गावे सातारा जिल्ह्यातही वसली असून, त्यांच्या डोक्यावर तीनशे ते चारशे फुटांचे मोठमोठे कडे आहेत. परळी खोऱ्यातील काळोशी हे अशा गावांपैकी एक असून, सतत सुटून पडणाऱ्या दगडांमुळे ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. अशा गावांचे वर्णन ‘माळीण’ दुर्घटनेनंतर तातडीने ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली असून, प्रशासकीय अधिकारी अशा गावांना भेटी देऊ लागले आहेत. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी शुक्रवारी काळोशी येथील धोकादायक ‘गायदार’ कड्याची पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेतल्या. मे महिन्यात दोन-दोन टनांचे दगड सुटून गावाच्या दिशेने आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आठ जून रोजी दहा टनांचा एक दगड तर गावातील मंदिराच्या वरील बाजूस येऊन सुदैवाने तिथेच थांबल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. छोटे-मोठे दगड नेहमीच निसटून पडतात. कड्याखालील सुमारे २५० फूट जमीन वन विभागाच्या हद्दीत असल्याने काहीच करता येत नाही आणि वनविभागाला सांगूनही डोळेझाक केली जाते, असे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडले.
‘डोंगरात झाडे लावा, वन विभागाच्या माध्यमातून झाडे उपलब्ध करून देऊ, तसेच मंदिराच्या वरील बाजूस संरक्षण भिंत बांधू,’ असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. वनविभागास बैठकीसाठी बोलावून चर्चा केली जाईल आणि लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामसभा बोलावून विविध उपाययोजना सुचविण्यात याव्यात आणि निवेदन तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, असे त्यांनी सुचविले. (वार्ताहर)
काळोशीची झाडे अंबवड्यात कशी?
काळोशी गावासाठी पाणलोट निधीतून सुमारे सहा लाख ५४ हजारांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून झाडे आणली गेली. परंतु निधी काळोशी पाणलोट समितीचा, तर झाडे अंबवडे बुद्रुकच्या हद्दीत लावण्यात आली, असा गौप्यस्फोट ग्रामस्थांनी तहसीलदारांसमोर केला. याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
आज निवेदन देणार
कड्याचे दगड वारंवार गावावर कोसळत असल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी काळोशी ग्रामस्थ शनिवारी (दि. २) जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. निवेदनाच्या प्रती खासदार, आमदार, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
माळीण येथील घटना खूपच भयानक आहे. सातारा तालुक्यातील अशा ठिकाणांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला; त्यामुळे काळोशी येथील धोक्याचे गांभीर्य तीव्रतेने समजले. काही वर्षांपूर्वी महाड येथे अशीच घटना घडली होती. तेथे ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत, तशाच काळोशी गावासाठी केल्या जातील.
- राजेश चव्हाण, तहसीलदार, सातारा
रेंगडी ग्रामस्थांचा जीव मुठीत
प्रशासनाचे लक्ष : घाटात दरड कोसळल्यानंतर जमिनीला भेग
मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर रेंगडी गावानजीक दोन दिवसांपूर्वी दरड कोसळल्यानंतर तेथून रेंगडी गावापर्यंत जमिनीला सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर परिसरात भेग पडली असून, पावसाचा जोर वाढल्यास जमीन खचण्याची तसेच दरड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. रेंगडी गाव संपर्कहीन होण्याचाही धोका असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
जावळीचे तहसीलदार रणजित देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. भूजल विकास यंत्रणेचा अहवाल शनिवारपर्यंत अपेक्षित असून, प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे तहसीलदारांनी सांगितले.
जावळी-महाबळेश्वर तालुक्यांच्या सीमेवर व मेढा-महाबळेश्वर मार्गावर रेंगडी हे सुमारे साडेपाचशे ते सहाशे लोकवस्तीचे गाव असून, ते डोंगरकपारीत वसले आहे. या मार्गावर काळा कडा असलेल्या परिसरात दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार घडतात. दोन दिवसांपूर्वीच केळघर घाटात दरड कोसळली व महाबळेश्वर रस्ता ठप्प झाला. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. तथापि, दरड कोसळल्याच्या ठिकाणापासून गावापर्यंत जमिनीला भेग पडल्याचे आज निदर्शनास आले. ग्रामस्थांनी प्रशासनाला हे सांगितल्यावर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तहसीलदार इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. या परिसरात पावसाचा जोरही कायम असून, तो वाढल्यास जमिनीला पडलेली भेग रुंदावण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रेंगडी गावातील काही घरे संपर्कहीन होण्याचा धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थ भयभीत आहेत. प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात
आहे. (प्रतिनिधी)
डोक्यावर धोका;
पण पाय उचलेना!
पाटण : माळीणसारखी अनेक गावे पाटण तालुक्यात आहेत. त्यापैकी काही गावे अत्यंत धोकादायक स्थितीत सुटलेल्या कड्याखाली वसली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत; पण जन्मभूमी सोडून जाण्यास तेथील गावांची पावले उचलत नाहीत. माळीण दुर्घटनेनंतर मात्र आता अनेक गावांचे पुनर्वसन प्रशासनाला करावेच लागणार आहे.
बोर्गेवाडी, टोळेवाडी, विठ्ठलवाडी, झिमनवाडी यांसारख्या वस्त्यांचे पुनर्वसन आज ना उद्या प्रशासनाला सक्तीने करावेच लागेल, इतकी गंभीर स्थिती आहे. कड्याखालच्या बोर्गेवाडीचा प्रश्न सर्वांत संवेदनशील आहे. १९९३ मध्ये अतिवृष्टी आणि भूकंपामुळे या कड्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर मृत्यूच्या सावलीसारखा हा कडा ग्रामस्थांजवळ उभा आहे. हा कडा फोडून बाजूला काढण्याचा विचार झाला होता. बोर्गेवाडी परिसरातील निम्म्या म्हणजे ३५ कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. अजूनही ३१ कुटुंबे कड्याखालीच राहत आहेत. राजकारणातून कान फुंकल्यामुळे काहींचा पुनर्वसनास विरोध, तर काहींना जन्मभूमी सोडवत नाही. म्हारवंड (निवकणे) ही ६१५ लोकसंख्येची वस्ती. त्यापैकी ८० कुटुंबांना डोंगराचा धोका आहे. मात्र त्या लोकांचा पुनर्वसनास विरोध आहे. विठ्ठलवाडी (शिरळ) येथील अकरा कुटुंबांतील ६५ लोकांना कड्याचा धोका निर्माण झाला होता. त्यातील १० कुटुंबांचे पुनर्वसन झाले असून एका कुटुंबाचा पुनर्वसनास विरोध आहे.मसुगडेवाडी-पाडळोशी येथे ३७ कुटुंबांना आणि जिमनवाडी-कुशी येथील ४६ कुटुंबांना कड्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सात ‘माळीण’
मार्चमध्येच पाठविला पुनवर्सनाचा प्रस्ताव : ३.१९ कोटींची केली मागणी
सातारा : जिल्ह्यात डोंगराचा कडा कोसळून धोका असणारी सात गावे असून, ही गावे एकाच पाटण तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे, या गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दि. ४ मार्च २०१४ रोजी पाठविला असून, त्यासाठी त्यांनी ३.१९ कोटींची मागणीही केली आहे.
पुणे जिल्ह्यात ‘माळीण’ गावावर डोंगर कोसळल्यामुळे राज्यभरात अशा प्रकारे दरड अथवा डोंगराचा कडा कोसळून धोका असणारी गावे किती आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या जिल्हा आपत्कालीन विभागाने यापूर्वीच अशा गावांचा शोध घेतला असून, त्यासाठी काय करता येईल, याचा आराखडा तयार केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, आपत्कालीन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांनी दि. --मार्च रोजी प्रस्ताव पाठवून याची कल्पना शासनाला दिली आहे.
प्रस्ताव पाठविण्यात आलेली गावे पाटण तालुक्यातील आहेत. विठ्ठलवाडी (शिरळ), बोर्गेवाडी (मेंढोशी), जिमनवाडी (कुशी), मसुगडेवाडी (पाडळोशी), टोळेवाडी, म्हारवंड, घेरादातेगड अशी या गावांची नावे आहेत. जिल्हा प्रशासनाने या सर्व गावातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. (प्रतिनिधी)
--कोणत्या गावाची काय स्थिती...
विठ्ठलवाडी (शिरळ) : येथील घरांची संख्या अकरा असून, कुटुंबसंख्याही तितकीच आहे. लोकसंख्या ६५ आहे. या ठिकाणी आजमितीस चार कुटुंबे राहत असून, त्यापैकी दोन कुटुंबे कामानिमित्त मुंबईत वास्तव्य करून आहेत.
--बोर्गेवाडी (मेंढोशी) : येथे ६१ कुटुंबे होती. यापैकी ३० कुटुंबांचे पुनर्वसन यापूर्वीच झाले असून, उर्वरित ३१ कुटुंबांनी पुनर्वसन स्वीकारलेले नाही. येथील एकूण कुटुंबसंख्या ३१ तर लोकसंख्या २७५ आहे.
--जिमनवाडी (कुशी) : येथे ४६ कुटुंबे असून, १९४ लोकसंख्या आहे.
--मसुगडेवाडी (पाडळोशी) : येथे ३७ कुटुंबे असून, २१४ लोकसंख्या आहे.
--टोळेवाडी येथे १७९ कुटुंबसंख्या असून, ११०० लोकसंख्या आहे.
--म्हारवंड : येथे ८० कुटुंबे असून, लोकसंख्या ४१० आहे. तलाठ्यांनी दिलेला अहवाल लक्षात घेता संबंधित ग्रामस्थांचा पुनर्वसनास विरोध आहे.
--घेरादातेगड : येथील ६८ कुटुंबांची लोकसंख्या ३८० असून, सर्वांचे पुनर्वसन एका जागेवर झाले आहे. या ठिकाणाला आता गावठाणाची मान्यता मिळावी, अशी मागणी आहे.