ग्रेड सेपरेटरचा फलक फाडल्याने साताऱ्यात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:16+5:302021-01-10T04:30:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकत्याच उद्घाटन झालेल्या ग्रेड सेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने ...

ग्रेड सेपरेटरचा फलक फाडल्याने साताऱ्यात तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकत्याच उद्घाटन झालेल्या ग्रेड सेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने फाडल्याने साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उदयनराजे समर्थकांनी घटनेचा निषेध करून संबंधितावर कारवाईची मागणी केली.
पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी रात्री वायसी कॉलेजसमोरील भुयारी मार्गाचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडून खाली फेकून दिला. हा प्रकार शनिवारी सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जलद कृतीदलाच्या दोन तुकड्यांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा पोवई नाक्यावर पोहोचला. याच वेळी खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थकही मोठ्या संख्येने तेथे आले.
या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. खा. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी न येता कार्यकर्त्यांना फोनवर शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यापर्यंत मूक मोर्चा काढला.
चौकट : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचा फलक फाडल्यामुळे पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी हा फलक फाडण्यात आला. त्या परिसरात एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात जाऊन पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. रस्त्यावरून ये-जा करणारे या सीसीटीव्हीमध्ये दिसून येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे हे कृत्य करणारे लवकरच सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.