अवघ्या दहा हजारात भातझोडणी यंत्र
By Admin | Updated: November 5, 2014 00:08 IST2014-11-04T21:17:03+5:302014-11-05T00:08:49+5:30
शासकीय अनुदान : संगमेश्वर कृषी विभागाकडे नारळ काढण्यासाठी शिडीही उपलब्ध

अवघ्या दहा हजारात भातझोडणी यंत्र
मार्लेश्वर : नारळाच्या झाडावर सहजगत्या चढून नारळ काढता यावेत तसेच चांगल्या प्रकारे भातझोडणी करता यावी, यासाठी संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदानावर नारळ काढणी शिडी व भात झोडणी विद्युत यंत्र पंचायत समिती कृषी विभागात उपलब्ध झाले आहे.
कृषी विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ काढणी शिडी व भातझोडणी विद्युत यंत्र शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्याची योजना राबवण्यात आली आहे. नारळाचे झाड अतिशय उंच असल्यामुळे नारळाच्या झाडावर चढून नारळ काढणे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यामुळे नारळाच्या झाडावर सहजगत्या चढता यावे, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने नारळ काढणीची शिडी बनवली आहे. ही शिडी शासनाने शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत देण्याचे ठरवले आहे.
सध्या या शिडीची किंमत २ हजार ७०० रुपये इतकी आहे. परंतु ही शिडी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर १ हजार ३५० रुपयात दिली जाणार आहे. तसेच परंपरागत करण्यात येणाऱ्या भात झोडणीसाठी मनुष्यबळ जास्त लागते. त्यामुळे भात झोडणी करण्यासाठी सहसा मजूर मिळत नाहीत. त्याला पर्याय म्हणून आता अत्यंत कमी वेळेत व स्वच्छ भात झोडणी विद्युत यंत्र तयार करण्यात आले आहे.
हे यंत्रसुद्धा ५० टक्के अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या भातझोडणी विद्युत यंत्राची मूळ किंमत २० हजार रुपये इतकी असून, ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना १० हजार रुपयात दिले जाणार आहे. या दोन्ही यंत्रांचा संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांसाठी लाभ होणार आहे.
या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी व इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा उतारा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी रेशनकार्ड झेरॉक्स व फोटो ओळखपत्र झेरॉक्स आदी कागदपत्र जोडून आपले प्रस्ताव कृषी विभागात सादर करावेत. या योजनांचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदान मिळणार.
नारळाच्या झाडावर चढण्याची शिडी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर १ हजार ३५० रुपयात दिली जाणार.
भातझोडणी यंत्रावरही ५० टक्के अनुदान.
सातबारा उतारा बंधनकारक.
रेशनकार्ड झेरॉक्स व फोटो ओळखपत्रही आवश्यक.