डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला भीषण आग
By Admin | Updated: December 16, 2014 23:40 IST2014-12-16T22:16:06+5:302014-12-16T23:40:18+5:30
शिरवळ येथील घटना : २० लाखांचे नुकसान; आगीबाबत उलट-सुलट चर्चा

डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला भीषण आग
शिरवळ : शिरवळ, (ता. खंडाळा) येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावलेल्या डॉल्बी सिस्टीमच्या टेम्पोला आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला आग लागली की लावण्यात आली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील करन विश्वास कुचेकर यांच्या मालकीची साई डिजीटल-डॉल्बी म्युझिक सिस्टम नावाची डॉल्बी सिस्टीम आहे. सदर डॉल्बी सिस्टीम टाटा टेम्पो (एमएच ०६ के. ४५६१) यावर बसविण्यात आली आहे. काल (सोमवार दि. १५) शिरवळ येथील एक लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून सदरची डॉल्बी सिस्टीम बसस्थाणक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावण्यात आली होती. यावेळी करण कुचेकर यांनी रात्री ८ च्या सुमारास गाडीजवळ येऊन टेम्पो १० मिनिटे सुरू केले. त्यानंतर टेम्पो बंद करुन टेम्पोमधील बॅटरीच्या वायरी बॅटरीपासून दुर केल्या व काचा लावत घरी झोपण्यासाठी गेले.
पहाटे तीनच्या सुमारास संबंधीत डॉल्बी सिस्टिमला आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खाजगी टँकरच्या सहाय्याने टेम्पोला लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात नागरिक व पोलीसांना यश आले. मात्र, तोपर्यंत अगीत टेम्पोचे, म्युझिक सिस्टमचे, साऊंड, एम्पलीफायर मशीनचे, एअर कंडिश्नर, जनरेटर, इलेक्ट्रीक साहत्य जळून खाक झाले. आगीत डॉल्बी सिस्टीमचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदान व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टीमला आग लागली की लावण्यात आली? याबाबत साशंकता निर्माण झाली असून याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस दुरक्षेत्रात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार रफिक पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांना अग्निशमन बंबांची प्रतीक्षा...
शिरवळ व परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत असताना या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना सतत घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरवळजवळील भंगाराच्या दुकानाला आग लागून लोखोंचे नुकसान झाले होते. तर महामार्गावर ट्रक जळून खाक झाला होता. याठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने प्रशानाकडे अग्निशमन बंबासाठी प्रस्ताव देऊनही याकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रस्ताव कित्येक महिने जिल्हाधिकारी कार्यालयात धुळखात पडला आहे. याठिकाणी लवकरात-लवकर अग्निशमन बंब उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.