शिक्षकांचे राजकारण ग्रामसभेत गाजले!
By Admin | Updated: August 24, 2014 22:40 IST2014-08-24T21:26:46+5:302014-08-24T22:40:04+5:30
सदस्य आक्रमक : जंगलवाडी शाळेबाबत कारवाईची मागणी

शिक्षकांचे राजकारण ग्रामसभेत गाजले!
चाफळ : विभागातील जंगलवाडी, ता. पाटण येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना विश्वासात न घेता कारभार करत आहेत. शालेय कार्यक्रमामध्ये राजकारण आणून गावात राजकीय तेढ निर्माण करत आहेत. शिक्षकांची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी सरपंच अंजना केंजळे यांनी केली.
ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेत त्या बोलत होत्या. यावेळी उपसरपंच योगेश पवार, सदस्या शशिकला पवार, मुगुटराव केंजळे, ग्रामसेवक संदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीला ग्रामसेवक निकम यांनी मागील सभेचे प्रोसेडिंंग वाचन केले. यानंतर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
जाधववाडी गाव पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजनेमध्ये बसण्यासाठी थकित कर भरण्यात यावा, अन्यथा थकित खातेदारांवर कारवाई करण्याात येणार असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या गावस्तरावर सोडवण्यासाठी समिती स्थापन करणे, विहीर बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे, पाझर तलावातील गाळ काढणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
ऐनवेळच्या विषयादरम्यान जंगलवाडी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात येऊन शिक्षक राजकारण करत असल्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्याची मागणी सरपंच केंजळे यांनी केली. तसेच गावात दारूबंदी करण्याची मागणीही यावेळी महिलांनी केली. पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाई निकाली काढण्याबाबत गावात लवकरच नळपाणी योजना राबवण्यात येणार असल्याचे उपसरपंच योगेश पवार यांनी सांगितले.
ग्रामसभेस विश्वास जाधव, रामचंद्र पवार, संपत गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये जंगलवाडी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासही सरपंचांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिक्षक राजकारण करून गावातील वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.