तात्या, आबांसोबत आता काका!
By Admin | Updated: May 8, 2015 00:20 IST2015-05-07T22:59:33+5:302015-05-08T00:20:56+5:30
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील बऱ्याच कालावधीपासून बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत.

तात्या, आबांसोबत आता काका!
संजीव वरे - वाई -जिल्हा बँक निवडणुकीत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील यांनी बापूसाहेब शिंदे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. यामुळे लक्ष्मणतात्या अन् मकरंद आबांसोबत तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील बऱ्याच कालावधीपासून बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. वाई तालुक्यात त्यांचेच वर्चस्व असून, यावेळी त्यांची खरेदीविक्री संघातून बिनविरोध निवड झाली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हा बँकेसाठी लागणाऱ्या ठरावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती; परंतु उमेदवार कोण? अशी चर्चा असतानाच राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि राष्ट्रवादीने कंबर कसली. नितीन पाटील यांच्या विरोधात वाई पश्चिम भागाचे नेते बापूसाहेब शिंदे यांचा अर्ज राहिल्याने रंगत वाढेल, असे चित्र निर्माण झाले होते. कारण बापूसाहेब शिंदे यांचे पश्चिम भागातील काही सोसायट्यांवर वर्चस्व आहे, तसेच काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांशीही राजकीय संबंध चांगले राहिले आहेत. परंतु, आमदार मकरंद पाटील व पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय सर्वस्व पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली व मोठ्या फरकाने जिंकली. पुन्हा एकदा या तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे, हे सिद्ध केले. या निवडणुकीच्या निमित्ताने वाईतून जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील सक्रिय राजकारणात आले आहेत. ‘काका’ या नावाने परिचित असलेले नितीन पाटील हे प्रत्येक निवडणुकीत मोठी जबाबदारी सांभाळत असत. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अधिक राजकीय बळ मिळाले आहे.