पाण्यासह टाकी कोसळली

By Admin | Updated: June 14, 2016 00:22 IST2016-06-13T22:46:17+5:302016-06-14T00:22:26+5:30

तांबवेत दुर्घटना : दोन कार, पाच दुचाकींचे नुकसान; जीवितहानी टळली

The tank collapsed on the water | पाण्यासह टाकी कोसळली

पाण्यासह टाकी कोसळली

तांबवे : तांबवे गावाला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी सोमवारी पहाटे साडेतीन वाजता दीड लाख लिटर पाण्यासह अचानक कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन कार व पाच दुचाकींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही पाण्याची टाकी जमीनदोस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, ठेकेदार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे घटनास्थळी आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे त्या दोघांनी लगेच तेथून काढता पाय घेतला.
तांबवे गावची लोकसंख्या ५ हजार ८८१ आहे. तीन वर्षांपूर्वी येथे लोकसहभागातून चोवीस तास पाणी योजनेचे काम करण्यात आले. हे काम मलकापूरच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन ४ मे २०१३ रोजी टाकीचे उद्घाटन झाले. १ लाख ३० हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली ही टाकी रघुनाथ मंदिराजवळ कोयना नदीकाठी बांधण्यात आली होती. सोमवारी पहाटे अचानकच ही टाकी कोसळली. पाण्याची टाकी कोसळताना मोठा आवाज झाला. परिसरातील जमीन हादरली. भूकंप झाल्याच्या शक्यतेने ग्रामस्थ जीव वाचविण्यासाठी घराबाहेर आले. मात्र, पाण्याची टाकी कोसळत असल्याचे दिसताच ते जिवाच्या आकांताने सुरक्षित ठिकाणी पळाले.
टाकीजवळ रस्त्यावर पार्क केलेली अनिल इनामदार व पंडित पाटील यांच्या कार पाण्याने वाहून गेल्या. दोन्ही कार टाकीपासून १०० मीटर लांब गेल्या आहेत. नदीकाठाला पाणवठ्यावर लावलेल्या झाडामुळे गाड्या थांबल्या, अन्यथा त्या गाड्या नदीत गेल्या असत्या. तसेच किशोर पाटील, भाऊसाहेब पाटील, भगवान पाटील, विकास पाटील व सुनील पाटील यांच्या टाकीशेजारी लावलेल्या दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. (वार्ताहर)

Web Title: The tank collapsed on the water