प्रमोद सुकरे कऱ्हाड: पाटण - कोयनेचे खोरे भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते.येथे भूकंपाचे छोटे मोठे धक्के तर नेहमीच बसत असतात. इथली जनता तर जणू भूकंप उशाला घेऊन झोपते म्हणे.पण याच खोऱ्यात सध्या राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू आहेत. येथील आणखी एका 'पाटणकरां'ना 'कमळा'ची भुरळ पडल्याचे खात्रीशीर समजते. आता या भूकंपाचा धक्का नेमका कधी बसणार अन् त्याची तिव्रता काय असणार हे कळण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे एवढेच.
खरंतर पाटण तालुक्यातील राजकारण आजवर नेहमीच दोन पक्षांमध्ये नव्हे तर दोन गटांभोवती फिरताना पहायला मिळाले आहे.हे राजकारण कधी 'वाड्यावरुन' तर कधी साखर 'कारखान्यावरुन' हालते एवढेच. अलिकडे मात्र काही वर्षांपासून कारखान्यावरुनच कारभार हाकला जातोय. त्यामुळे वाड्यावर भलतीच अस्वस्थता पसरली आहे. हिच अस्वस्थता ओळखून 'कमळा'ने त्यांना जाता जाता इशारा केल्याचे दिसते आहे. त्यांनाही त्यांची भुरळ पडली असून आता फक्त भूकंप कधी होणार एवढीच प्रतिक्षा आहे.
'बाबा'आहेत आता 'दादा'ही जाणार!खरंतर राष्ट्रवादीत असणारे एक दाढिवाले पाटणकर 'बाबा' यापुर्वीच भाजपवासी झाले आहेत. आता विधानसभेला 'रिक्षा' पलटी झालेले पाटणकर 'दादा'ही भाजपमध्ये जाणार हे निश्चित मानले जाते. आता हे पाटणकर दादा भाजपमध्ये का चाललेत हे 'बच्चा' -'बच्चा' जाणता है ..
पण पुनर्वसन कोठे होणार?पाटण तालुक्यातील भूकंप प्रवण क्षेत्रातील अनेक गावांचे, लोकांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करण्यात आले आहे. पण आता राजकीय भूकंपाच्या लाटेत येणाऱ्या त्या नेत्यांचे नेमके कोठे पुनर्वसन होणार? हे पहावे लागणार आहे. सध्या तर राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा बोहल्यावर चढण्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. पण हो पाटण तालुक्यातील सगळ्या लोकांचे पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही मिटलेले नाहीत बरं!
भूकंप अभ्यासासाठी यंत्रणापाटण तालुक्यात वारंवार होणारे भूकंप, त्यांची क्षमता तपासण्यासाठी तेथे स्वतंत्र यंत्रणा बसविण्यात आली आहे. अलिकडे तर भूकंपाच्या वेळी भूगर्भात होणाऱ्या हालचालिंचा अभ्यास करण्यासाठी खूप मोठे होल या परिसरात जमिनीवर घेण्यात आले आहे. कराडातील संशोधन केंद्रातून त्याचा अभ्यास होतो. त्यामुळे त्यांचा अभ्यास सुलभ झाला आहे.पण येथील राजकीय भुकंपाचा अभ्यास कोण करणार? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
म्हणे 'भोसलें'च्या पुढाकार!पाटणकरांच्या हातात 'कमळ' देण्यासाठी एका 'भोसलें'नी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.आता हे भोसले वाई, सातारा की कराडचे हे कळण्यासाठी सर्वांना थोडा अभ्यास तर करावाच लागेल. पण या भुकंपाला नुतन जिल्हाध्यक्षांच्या हस्तेच मुहूर्त लागणार हे निश्चित.