तालुकाध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडली : काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:23+5:302021-06-23T04:25:23+5:30
दहिवडी : ‘राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला माण तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले होते. मात्र, मतदारसंघातील काही ...

तालुकाध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडली : काळे
दहिवडी : ‘राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला माण तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले होते. मात्र, मतदारसंघातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्तिदोषातून चुकीची माहिती दिल्याने अध्यक्षपदाला स्थगिती मिळाली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे आपण बाजू मांडली आहे. मी २००६ पासून काँग्रेसचा शिपाई म्हणून काम करत आहे यापुढेही निष्ठेने काम करत राहणार आहे. त्यामुळे पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो मान्य असेल,’ असे मत राष्ट्रीय काँग्रेस युवकचे राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी व्यक्त केले.
दादासाहेब काळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पक्ष नेहमीच न्याय देतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण माण खटाव युवकचे अध्यक्षपदाची व राज्य युवक चिटणीसपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. पक्षात किती आले अन् गेले तरी आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहोत अन् काम करत राहणार आहे. समाजाच्या हितासाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीत राज्यभर काम करत आहे. ओबीसी समन्वयक म्हणून काम करत आहे. त्यामुळे समाजबांधव आपल्याशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे.
माण तालुक्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आपणावर पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र निवडीनंतर मतदारसंघातील नेत्यांनी गैरसमजातून पक्षश्रेष्ठींकडे चुकीची माहिती दिल्याने आपल्या निवडीला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीनंतर समाजबांधव व कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत निषेध व्यक्त केले. मात्र ते आपल्या प्रेमापोटी केले असून सर्वांनी शांत राहून सहकार्य करावे. पक्षश्रेष्ठींना तालुक्यातील राजकीय कुरघोड्या चांगल्याच माहीत आहेत. ते निश्चितच चांगल्या कार्याची दखल घेत आपल्याला न्याय देतील,’ असा विश्वासही पत्रकातून व्यक्त केला आहे.