माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; पतीसह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:36+5:302021-05-30T04:30:36+5:30
उंब्रज : ‘नव्या बुलेट गाडीसह घर बांधण्यासाठी पत्नीला माहेरवरून पैसे आण, म्हणणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह सासू, सासरा, ...

माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; पतीसह तिघांवर गुन्हा
उंब्रज : ‘नव्या बुलेट गाडीसह घर बांधण्यासाठी पत्नीला माहेरवरून पैसे आण, म्हणणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह सासू, सासरा, दीर यांच्यावर संबंधित पोलिसाच्या पत्नीने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण विलास कांबळे, विलास दिनकर कांबऴे, कमल विलास कांबऴे, गणेश विलास कांबळे (सर्व रा.पेरले ता. कऱ्हाड) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी नावे आहेत.
उंब्रज पोलिसांत प्राजक्ता श्रीकृष्ण कांबळे (वय २३ रा.पेरले ता.कऱ्हाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सातारा पोलीस दलामध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या श्रीकृष्ण कांबळे यांच्यासोबत प्राजक्ता यांचा दि. १३ ऑगस्ट, २०१७ रोजी विवाह झाला. यानंतर, प्राजक्ता या पती श्रीकृष्ण यांच्यासोबत फलटण येथे राहत होत्या. त्यानंतर, प्राजक्ता यांना दिवस गेल्याने त्या प्रसूतीसाठी माहेरी कोर्टी (ता.कऱ्हाड) येथे आल्या. त्यांनी मुलीला जन्म दिला. या दरम्यान, पती, सासरे, सासू हे प्राजक्ताच्या वडिलांच्या व भावाच्या मोबाइल वारंवार फोन करून, घर बांधण्यासाठी ३ लाखांची मागणी करू लागले. त्यानंतर, प्राजक्ता या पेरले या गावी सासरी आल्या. नंतरही सासू, सासरे, पती वारंवार घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असा तगादा लावून शिवीगाळ जाचहाट करत होते. प्राजक्ताला ‘तू तुझ्या मुलीला घेऊन तुझ्या वडिलांकडे जा आणि तिचा औषध पाण्याचा सर्व खर्च तुझ्या आई- वडिलांकडून करून घे,’ असे बोलत होते. या दरम्यान, पतीने प्राजक्ता यांना ‘तुझ्या वडिलांकडून बुलेट घेऊन ये,’ असेही सांगितले होते. त्यावरून प्राजक्ता म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांकडे ऐवढे पैसे नाहीत,’ असे म्हणाल्याच्या कारणावरून पतीने प्राजक्ताला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, ‘तू जर मला बुलेट आणून दिली नाहीस, तर माझ्या ओळखीच्या गुंडांकडून तुझ्या आई, वडील, भाऊ, बहीण यांना मारहाण करीन, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हणले आहे. दरम्यान, श्रीकृष्ण यांची फलटण पोलीस ठाण्यातून पाटण पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यानंतर, श्रीकृष्ण याने प्राजक्ता यांना एका मुलीबरोबर अनैतिक संबंध असल्याबाबतचे फोटो दाखविले. या कारणावरून वारंवार भांडणे करू लागला, तसेच प्राजक्ता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेत प्राजक्तासह मुलीला रात्रभर घराबाहेर ठेवले. यामुळे प्राजक्ता या जीव देण्यासाठी गेल्या असता, त्यांना त्याच्या ओळखीच्या एकाने वाचविले, असे फिर्यादीत म्हटले आहे.