उसवलेल्या आयुष्याला मेहनतीचा ‘टाका’!

By Admin | Updated: March 3, 2016 00:02 IST2016-03-02T22:33:38+5:302016-03-03T00:02:02+5:30

कृष्णा पोळ : शिलाई मशीन उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवून भुर्इंजचे नाव उद्योग क्षेत्रात झळकवले

Tackle hard working life! | उसवलेल्या आयुष्याला मेहनतीचा ‘टाका’!

उसवलेल्या आयुष्याला मेहनतीचा ‘टाका’!

राहुल तांबोळी - भुर्इंज--धोम धरणाच्या उभारणीत सारं घरदार गेलं. संपूर्ण संसार पाठीवर टाकून परक्या गावाची वाट धरावी लागली. नव्या ठिकाणी, नव्या जागेत नवा संसार थाटताना भविष्याची काळजी होतीच; पण भविष्य घडविताना आपल्यासोबत इतरांचंही आयुष्य घडविण्याची किमया या धरणग्रस्तांपैकीच एक असणाऱ्या कृष्णा संभाजी पोळ यांनी करून दाखवली. वाई तालुक्यातील भुर्ईंज गावात धरणग्रस्त म्हणून स्थायिक झाल्यानंतर भुर्इंजच्याच मातीत शिलाई मशीन उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवून आज त्या उद्योगास भला मोठा विस्तार केला आहे. ज्या भुर्इंज गावाशी कायमची नाळ जोडली गेली त्या भुर्इंज गावाचेही नाव उद्योगक्षेत्रात मोठे करण्यात त्यांनी यश मिळविले आहे.
कृष्णा पोळ जेव्हा आपल्या कुटुंबीयांसमवेत भुर्इंजमध्ये आले तेव्हा ते अगदी पोरसवदा होते. वडील संभाजीशेठ पोळ यांच्याकडून शिवणकलेचे धडे घेत ‘डिसेंट’ या नावाने भुर्इंजमध्ये व्यवसायाला सुरुवात केली. मात्र तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. शिलाई मशीन खोलून ती परत जोडायची, शिलाई मशीनमध्ये आणखी काय आधुनिकीकरण करता येईल, याचा विचार करत त्याचे प्रयोग करायचे याचा ध्यासच त्यांना लागला. या ध्यासातूनच त्यांनी स्वत: संपूर्ण नवी शिलाई मशीन तयार केली. केवळ एक शिलाई मशीन तयार करून ते थांबले नाहीत, तर शिलाई मशीन उत्पादनाचा कारखानाचा काढण्याचा त्यांनी विचार केला आणि प्रत्यक्षात तो अंमलात आणला. ग्रामीण भागात शिलाई मशीन उत्पादनाचे त्यांचे हे प्रयत्न अनेकांनी हसण्यावारी नेले. सुरुवातीला अनेकजणांनी त्यांची खिल्ली उडविली. मात्र त्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही.
तत्पूर्वी त्यांनी ‘डिसेंट’ हा ब्रँड केंद्र सरकारकडे रजिस्टर केला आणि त्यानंतरच त्यांनी ‘डिसेंट’ शिवणयंत्रांच्या उत्पादनाला सुरुवात केली. पहिल्या शिलाई मशीनचे पूजन ग्रामदैवत महालक्ष्मीच्या चरणी केले आणि शिलाई मशीन उत्पादन करताना त्यामध्ये वेळोवेळी नवनवीन प्रयोग करून वारण्यास अगदी सहजसोप्या आणि आवाज न करणाऱ्या तसेच विविध आधुनिक सोयी असणाऱ्या शिलाई मशीनचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. शिलाई मशीनची केवळ विक्री नाही तर विक्रीपश्चात खात्रीशीर व मोफत सेवा देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे डिसेंट कंपनीची उत्पादने संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर जाऊ लागली. जिल्ह्यात आज प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी ‘डिसेंट’ शिवणयंत्राचे डिलर आहेत.
शिलाई मशीन, पाटा बेअरिंग व या क्षेत्राशी निगडीत विविध उत्पादनांचे भव्य दालन भुर्इंजसारख्या ग्रामीण भागात आता दिमाखाने उभे राहिले आहे. पाटा बेअरिंगचा शोध लावताना त्यांना प्रचंड त्रास झाला, खूप मोठे आर्थिक नुकसान झाले; मात्र मूळच्याच जिद्दी स्वभावाच्या पोळ यांनी हार न माणता पाटा बेअरिंगचा शोध लावण्यात यश मिळविलेच. विविध रंगांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिलाई यंत्रे आता सर्वांच्या खात्रीला उतरली आहेत.


नवख्यांना मार्गदर्शन
स्वत:चा व्यवसाय मोठा करताना पोळ यांनी अनेक मराठी तरुणांना उद्योग व्यवसायाची वाट दाखवली आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करताना तो व्यवसाय रजिस्टर करण्याचे कामही ते करतात. जगावेगळा उद्योजक असणाऱ्या पोळ यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर व्यवसायाचा प्रारंभ करून आपल्या या दैवताला अनोखे वंदन केले.


घरात कोणताही वारसा नसताना..
घरात कोणताही उद्योजकतेचा वारसा नसताना कृष्णा पोळ यांनी स्वत:च्या हिमतीवर मिळवलेले यश नजरेत भरण्यासारखे आहे. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची दैवते आहेत. या दोन्ही महामानवांचा पुरोगामी विचार प्रमाण मानून कोणत्याही कर्मकांडात न अडकता त्यांनी आपली उद्योजकीय घोडदौड सुरू ठेवली असून, त्यात त्यांनी प्रगती केली आहे, हे विशेष. त्यांच्या या व्यवसायामुळे आज अनेकांना हक्काचा रोजगार मिळू लागला आहे. जिद्द, ध्येय आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातही मोठा उद्योजक घडू शकतो, हेच कृष्णा पोळ यांनी आपल्या कर्तबगारीतून दाखवून दिले आहे.
व्यवसाचाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अनेक नवतरूण उद्योजकांचे ते नोंदणीचे किचकट काम अगदी लीलया करून देतात. प्रत्येकाला आदराने वागविणे आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत करणे हा स्वभाव ठेवल्यामुळे या क्षेत्रात त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Tackle hard working life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.