जांभळी गावावर भूत्सखलनाची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:44 IST2020-09-05T16:42:10+5:302020-09-05T16:44:22+5:30
वाई तालुक्यातील जांभळी येथे उत्खनन केले जात आहे. यामुळे रायरेश्वरला जाणाऱ्या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या गावांना भूत्सखलनाचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दहा ते पंधरा खरे कोसळू शकतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत.

जांभळी गावावर भूत्सखलनाची टांगती तलवार
वाई : वाई तालुक्यातील जांभळी येथे उत्खनन केले जात आहे. यामुळे रायरेश्वरला जाणाऱ्या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या गावांना भूत्सखलनाचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दहा ते पंधरा खरे कोसळू शकतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
जांभळीमध्ये बौध्द वस्ती व रायरेश्वरला जाणाऱ्या रस्त्याशेजारी असणाऱ्या घरांना उत्खनन केल्याने धोका निर्माण झाला आहे. याकडे वाई महसूल विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे जांभळी गावात माळीन गावांसारखी दुर्घटना घडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संबंधित घर मालक आनंदा भीमराव गाडे व शेजारीच राहणाऱ्या बौध्द वस्तीतील ग्रामस्थांनी जांभळी गावच्या पोलीस पाटील, तहसीलदार, वाई पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन देवून नाही त्यांनी या उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याने अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
याला जबाबदार असणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी जांभळी ग्रामस्थांनी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे, जांभळीतील एका व्यक्तीने दंडेलशाही करीत गावांतील पोलीस पाटील, महसूल विभागातील तहसीलदार व संबंधित अधिकारी, वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना हाताशी धरून प्रचंड जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृतरित्या उत्खनन केले आहे. त्यांच्याकडे वारंवार लेखी अथवा तोंडी तक्रार करूनही कसलीच दाखल घेण्यात आली नाही, त्यामुळे या परिसरात असणाऱ्या राहत्या घरांना धोका निर्माण झाला आहे. हे उत्खनन तत्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई व्हावी
काही वर्षांपूर्वी माळीन गावांत जशी डोंगर भूस्कलन झाल्याने दुदैर्वी घटना घडली होती. तशा धर्तीवर जांभळी गावात भविष्यात उत्खननामुळे भूत्स्खलन झाल्यास घरी खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आली आहे. माळीनसारखी दुर्घटना घडल्यास आश्चर्य वाटून घेवू नये, तरी या घटनेला जबाबदार असणारे अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा जांभळी गावांतील बौध्द वस्तीतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे, निवेदनावर वस्तीतील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
खांब, पिण्याच्या टाकीलाही धोका
रायरेश्वरला जाणारी जुनी पायवाट या उत्खननामुळे कायमची बंद झाली आहे. गावांतील पिण्याच्या पाण्याच्या पाईपला धोका निर्माण झाला आहे, घराशेजारी असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या खांबाना सुध्दा उत्खनामुळे धोका पोहोचू शकतो. अनेक गोष्टी अडचणीत आणणार असलेल्या या उत्खननावरच कारवाई करून प्रशासनाने ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.