नृत्यातून सादर केले स्वयंवर! नटराज नृत्यशाळेच्या
By Admin | Updated: March 17, 2016 23:37 IST2016-03-17T22:04:57+5:302016-03-17T23:37:51+5:30
विद्यार्थिनींच्या पदलालित्याने रसिक मंत्रमुग्ध

नृत्यातून सादर केले स्वयंवर! नटराज नृत्यशाळेच्या
सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरमङ्क नटराज मंदिरात गुरू आँचल घोरपडे यांच्या नटराज नृत्य कला शाळेच्या कलाकारांनी शेषशायी विष्णू भगवान आणि पार्वती स्वयंवरांचे नृत्यातून दर्शन घडविले. या नृत्य व संगीत महोत्सवात आपल्या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनीे श्लोकमधील गणेशवंदना पदावर केली. गणेशाला वंदन करणारे पदावर नृत्यानंतर सरस्वती, महालक्ष्मी, शिवस्तुती सादर झाली. अनंतवर्षिणी रागातील एकतालातील पुष्पांजली व गणेश स्तुती ज्येष्ठ कलाकारांनी सादर केली. सुरेख पदन्यास तितकीच जलद हालचाल आणि तेवढ्याच चेहऱ्यावरील हावभावाची झलक सादर करत या बालकलाकारांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. संत कालिदास रचित व सुप्रसिद्ध गायक येसुदास यांच्या आवाजील पार्वती स्वयंवराचा देखावा सादर होताना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गुरू आँचल यांच्यासह ५४ बालकलाकारांचा सत्कार शर्मिष्ठा आगाशे, सुलोचना कणसे व विनया माने व संयोजिका उषा शानभाग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रे देऊन करण्यात आला. यावेळी सर्व गायक, गायिका तसेच गायनाला साथ करणारे बाळासाहेब चव्हाण व भानुदास ओतारी, सतार वादक बोस या वादकांनाही जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, विश्वस्त के. नारायण राव, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, वासुदेवन नायर, गोविंंद लेले, संकेत शानभाग, राहुल घायताडे, कविता शानभाग, पराग काटदरे, कलाशिक्षक महेश सोनावणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गौरी बागवडे यांनी या बहारदार नृत्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) पेटते तांबे, कमरेवर पाणी अन् पायात परात तामीळ भाषेतील ‘नटराज’ या नृत्य देवतेचे वर्णन करणारे आडू चिदंबरम वर नृत्य सादर होऊन शिवरंजनी रागातील चतुश्र तालातील वर्णन हा आणखी एक शास्त्रीय नृत्य प्रकार सादर होत कुचीपुडी नृत्य प्रकारातील पदावर बालकलाकारांनी हातात पेटत्या तांबे आणि कमरेवर पाण्याची कळशी घेत पायाखाली परातीवर लयबद्ध ठेका धरत केलेला नाच अचंबित करणारा ठरला. आँचल घोरपडे यांनी ‘नटनयम्’ हे नृत्य सादर करीत भगवान शंकराची विविध रूपे उपस्थित प्रेक्षकांपुढे सादर केली. ‘शिव नमस्कारा’ सादर होऊन ‘शंभो महादेवा..’ सादर केला. धनश्री रागातील आदितालात बद्ध केलेला ‘तिल्लाना’ सादर झाला. तब्बल दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शंकर अन् नृत्यांगना! यावेळी के.एस.डी.शानभाग विद्यालयातील श्लोक घोरपडे याने भगवान शंकराची तर माधुरी पाटणकर यांनी विविध भावमुद्रेतील नृत्यांगनांची आकर्षक चित्रे रेखाटली.