म्युकरमायकोसिससाठी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:25+5:302021-06-23T04:25:25+5:30
सातारा : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कऱ्हाड येथे पाठवावे लागते. या रुग्णांवर सातारा ...

म्युकरमायकोसिससाठी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियागृह
सातारा : जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कऱ्हाड येथे पाठवावे लागते. या रुग्णांवर सातारा शहरातच उपचार व्हावेत, यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियागृह उभारण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, म्युकरमायकोसिस या विकारातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यांना कऱ्हाड येथील सह्याद्री अथवा कृष्णा हॉस्पिटलला पाठविले जाते. भविष्यात रुग्णांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन सातारा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयमध्ये शस्त्रक्रियागृह तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, निपाह व्हायरसचा धोका सातारा जिल्ह्याला नाही, असे स्पष्टीकरण देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्णवाढीचा दर ६.६९ टक्के इतका कमी झाला आहे. संभावित तिसऱ्या लाटेचा विचार करून लोकांनी बाजारपेठेमध्ये कमीत कमी गर्दी करावी. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
कोरोना महामारीच्या काळामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची रत्नागिरी येथे बदली झालेली आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाधिकारी म्हणाले, जोपर्यंत साताऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी मिळत नाही तोपर्यंत डॉ. आठल्ये यांना साताऱ्यातून रत्नागिरीला सोडण्यात येणार नाही.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले, हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आलेले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जम्बो कोविड हॉस्पिटल या दोन संस्था कॉलेजकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. तसेच माळवाडी येथील सावकार मेडिकल कॉलेज या संस्थेची इमारत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर शासकीय मेडिकल कॉलेजसाठी घेण्यात आले असून या ठिकाणी लॅब होस्टेल, क्लासेस, महाविद्यालयाची प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यात आलेले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन करून झालेल्या डॉक्टरांचे नोकरी अर्ज मागून घेतले आहेत. ५० ते ६० डॉक्टर यासाठी तयार आहेत. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.