सातारा/कोळकी : विडणी येथील पंचवीस फाटा येथे महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी महिलेचे अवयव शोधण्याचे काम सुरू असून, रविवारी एका ठिकाणी शेतात महिलेचे हात पोलिसांना आढळून आले. चारही दिशांना मृतदेहाचे तुकडे टाकून नैवेद्याचा नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.उसाच्या शेताजवळ महिलेच्या कंबरेखालील अर्धवट मृतदेह आढळून आला होता. त्या परिसरात पूजेचे साहित्यही पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वरील भाग शोधण्यासाठी परिसरातील १५ ते १६ एकरांतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे, तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. रात्रंदिवस तपासासाठी पोलिसांची फौज कामाला लाऊन घटनास्थळी छावणी उभारली आहे. घटनास्थळी अनेक पथके पाचारण करून तपासणी केली जात आहे.घटनास्थळी परिसरात दहा एकर ऊसतोड करून परिसर मोकळा केला. श्वानाद्वारे तपासणी केली, परंतु अवयव काही मिळून आले नाहीत. विडणी गावात व घटनास्थळ परिसरात लोकांची पोलिस चौकशी करीत आहेत. या दृष्टीने तपासणी सुरू आहे. घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास अत्यंत गोपनीय ठेवला आहे.
Satara: अंधश्रद्धेचा कळस, मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:15 IST