हॉटेलच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-26T00:01:10+5:302015-07-26T00:01:18+5:30
शिरवळ पोलीस आत्महत्येचे कारण शोधत

हॉटेलच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका हॉटेलच्या छतावरून विजय फुलसिंग जाधव (रा. विठाळा, ता. दिग्रस, जि़ यवतमाळ) या युवकाने उडी घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शिरवळ पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरवळ (ता़ खंडाळा) येथे राहणाऱ्या एका हॉटेलमध्ये अमित चव्हाण (मूळ गाव विठाळा) हा वेटर म्हणून कामास आहे़ शुक्रवारी त्याच्याच गावचा विजय जाधव हा तेथे नोकरीच्या शोधार्थ आला होता़ यावेळी अमितने मावसभाऊ रामरावला सोबत घेत विजय याला येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामासाठी लावले़ यावेळी विजयला संबंधितांनी शनिवारपासून कामावर येण्यास सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अमित व विजय एकत्रित हॉटेलवर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास अमित लघुशंकेसाठी उठला असता शेजारी विजय आढळला नाही. अमितने शोधाशोध केली असता विजय छताच्या खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला़ अमितने खाली जाऊन पाहणी केली असता विजय जागीच मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले़ शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. (प्रतिनिधी)