एकरी दीडशे टन उत्पादनाचा पाया ऊस सुपरकेन नर्सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:03+5:302021-06-27T04:25:03+5:30
नागठाणे : ‘उसाचे एकरी दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी सुपरकेन नर्सरी म्हणजे पाया भरणी आहे,’ असल्याचे मत कोल्हापूर विभागाचे कृषी ...

एकरी दीडशे टन उत्पादनाचा पाया ऊस सुपरकेन नर्सरी
नागठाणे : ‘उसाचे एकरी दीडशे टन उत्पादन घेण्यासाठी सुपरकेन नर्सरी म्हणजे पाया भरणी आहे,’ असल्याचे मत कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी व्यक्त केले.
नागठाणे, ता. सातारा येथील कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, मंडळ कृषी अधिकारी युवराज काटे, रोहिदास तिटकारे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय साळुंखे, प्रगतशील शेतकरी सुहास साळुंखे, सुनील साळुंखे, संतोष साळुंखे, गणेश साळुंखे, हिंदुराव साळुंखे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘ध्येयनिष्ठ शेतकऱ्यांनी उसाचे एकरी १५० टन उत्पादन घेण्यासाठी सुपरकेन नर्सरीतून स्वतःचे रोप तयार केले तर ५० टक्के कमी खर्चात सशक्त निरोगी रोपे मिळून उत्पादन खर्चात बचत होते. प्लॅस्टिक ट्रे किंवा कोको पिटमधील रोपापेक्षा सुपरकेन नर्सरीमधील एक डोळा कांडी ही मोठी असल्याने पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळे पहिल्या महिन्यापासूनच उसाची जोमदार वाढ होते. याशिवाय सुपरकेन नर्सरी ही स्वतःच्या शेतातच तयार होत असल्याने पुनर्लागवडीनंतर रोपे लवकर स्थिर होऊन उत्पादक फुटवे सशक्त मिळतात. मर होत नाही. सुपरकेन नर्सरीमधून २१ दिवसांत रोप लागवडी योग्य तयार होते व पुढे ३० ते ४० दिवसांपर्यंत त्याची लागवड करता येते. अशाप्रकारे उसाचे एकरी १५० टन उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या ५० शेतकऱ्यांचा एक गट बनविला असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऊस शेतीशाळेचे नियोजन केल्याची माहिती कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी यावेळी दिली.
या कृषी संजीवनी मोहिमेनिमित्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून ४०० एकर क्षेत्रावर केलेल्या सोयाबीन रुंद वाफा, सरी (बीबीएफ) पद्धतीच्या प्रक्षेत्राची पाहणी करून पाटील यांनी समाधान व्यक्त केले.