जिल्ह्यात पाच वर्षांनंतर प्रथमच साखरेचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:55 IST2018-04-01T22:55:11+5:302018-04-01T22:55:11+5:30

जिल्ह्यात पाच वर्षांनंतर प्रथमच साखरेचा उच्चांक
संजय कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा निश्चित पार करणार आहे.
साखर निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरल्यानंतर या हंगामात सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गाळपाचे रेकॉर्ड या हंगामात मोडणार आहे. यामध्ये २०१४-१५ मध्ये ७५ लाख ६५ हजार ६३२ लाख
मेट्रिक टन गाळप तर ८९ लाख ०६ हजार २९ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१५-१६ मध्ये ७७ लाख ६५हजार ३७८ लाख मेट्रिक टन गाळप तर ९० लाख ६६ हजार ९१८ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१६-१७ मध्ये ५४ लाख ३६ हजार ९३५ लाख मेट्रिक टन गाळप तर ६४ लाख ५१ हजार ७२ लाख क्विंटल साखर उत्पादन तर २०१७-१८ मध्ये मार्चअखेर ८१लाख ७६ हजार ९८७ लाख मेट्रिक टन गाळप तर ९७ लाख १४ हजार ९५५लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखाने
मार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. यातील श्रीराम-जवाहर, फलटण, लोकनेते बाळासाहेब
देसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराज
फलटण या पाच कारखान्यांचे गाळप आता बंद झाले आहेत. उर्वरित आठ कारखाने एप्रिलअखेर बंद होणार आहेत.
एफआरपीबाबत उदासीनता
एका बाजूला जिल्ह्यातील साखर उत्पादन उच्चांकी वाढले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जाहीर एफआरपी देण्याबाबत बहुतांशी कारखाने उदासीन राहिले आहेत. त्यामुळे शेतकºयांचा ‘मार्च एंड’ मात्र निराशजनक राहिला. अनेक कारखाने आजही शासनाच्या एफआरपी कायद्याला कोलदांडा दाखवत आहेत. मात्र, या कारखानदाराबाबत शासन बघ्याची भूमिका घेत आहे. एफआरपी नियमाप्रमाणे १४ दिवसांत देणं सर्वच कारखानदारांना बंधनकारक असतानाही ती न दिल्यामुळे शेतकरी मात्र कारखानदारांच्या भूमिकेबाबत नाराज आहेत.