साखर स्वस्त; पण गोडवा काही परवडेना !

By Admin | Updated: August 14, 2015 21:52 IST2015-08-14T21:52:04+5:302015-08-14T21:52:04+5:30

पदार्थांच्या दरवाढीचा ग्राहकांना फटका : दीड वर्षात साखरेचे दर घटले; पण पदार्थांचे दर ‘जैसे थे’; सामान्यांची पंचाईत

Sugar is cheap; But something sweet! | साखर स्वस्त; पण गोडवा काही परवडेना !

साखर स्वस्त; पण गोडवा काही परवडेना !

कोपर्डे हवेली : गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. साखरेचे दर कमी होत असताना साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर तेच असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
दोन वर्षांपूर्वी साखरेला मागणी होती. त्यामुळे साखरेच्या दरात वाढ झाली. परिणामी, साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीमध्येही वाढ झाली. सध्या बाजारपेठेमध्ये साखरेचे दर पडले असताना साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर मात्र तेच आहेत. त्यामुळे व्यापारी, विके्रते, चहा विक्रेते, मिठाई दुकानदार आदींसह इतर घटकांना त्याचा फायदा झाला. मात्र, शेतकरी आणि ग्राहकांना मात्र त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. गोड पदार्थांमध्ये ३० ते ४० टक्के साखरेचा समावेश असतो.
दोन वर्षांपूर्वी काही कालावधीमध्ये ३ हजारापासून ३ हजार ७०० रूपयांपर्यंत साखरेचा क्विंटलचा दर होता. त्यापेक्षा जास्त दराने किरकोळ दुकानदार ग्राहकांना साखर विकत होते. त्यावेळी हॉटेलसह इतर मिठाईवाल्यांनी पदार्थांचे दर वाढविले होते. ३ रूपयांचा चहा ५ रूपयांना विकला जात होता. सध्या खुल्या बाजारपेठेत मिळणाऱ्या साखरेचा दर १ हजार ८०० रूपयांपासून २ हजार रूपयांपर्यंत आहे.
किरकोळ दुकानदार यामध्ये वाढ करून २२ रूपये ते २३ रूपये किलोप्रमाणे साखर ग्राहकांना विकत आहेत.
शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी होऊनही त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या दरामध्ये घट झाली नाही. ज्यावेळी शेतीमालाचे दर वाढतील त्यावेळी मात्र त्यापासून तयार होणाऱ्या गोष्टींचे दर वाढविले जातात. त्यामुळे गोड खाण्याची सवय असलेल्यांना जीभेचे चोचले पुरवणे अवघड झाले आहे. (वार्ताहर)


साखरेच्या दरात कायम चढ उतार राहतात. मात्र, पदार्थाचा दर कमी केला तर तो परत वाढविताना अडचणी येतात. वाढलेले दर ग्राहक सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद उद्भवतात. परिणामी, वाढलेले दर आम्हाला तसेच ठेवावे लागतात.
- किरण फल्ले, व्यावसायीक, कोपर्डे हवेली

दरात सहा रूपयांची घट
गत वर्षातील मार्च महिन्यापासून आजपर्यंत साखरेच्या दरात ६ रूपयांनी घट झाली आहे. मार्च २०१४ मध्ये साखरेचा किरकोळ विक्रीचा दर प्रतिकिलो ३० रूपये होता. त्यानंतर हा दर डिसेंबरअखेर तसाच राहिला. डिसेंबर २०१४ ला त्यामध्ये दोन रूपये घट होऊन दर २८ रूपये प्रतिकिलो झाला. मार्च २०१५ रोजी हाच दर २७ रूपये तर मे मध्ये २६ रूपये झाला. जुलै महिन्यात २४ रूपये दराने साखरेची विक्री केली जात होती. तर सध्या साखरेचा दर २३ रूपये प्रतिकिलो आहे. साखरेचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sugar is cheap; But something sweet!