पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. ज्याचा सरकारी कमानीला झेंडा ! अजब प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्काराच्या फोटोचे भांडवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST2018-06-13T00:20:32+5:302018-06-13T00:20:32+5:30
‘जे नसे ललाटी...ते लिखे तलाठी,’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. या तलाठी मंडळींनी तहसील कार्यालयाची कमानच जाहिरात फलक लावण्यासाठी वापरली आहे.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. ज्याचा सरकारी कमानीला झेंडा ! अजब प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्काराच्या फोटोचे भांडवल
सातारा : ‘जे नसे ललाटी...ते लिखे तलाठी,’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. या तलाठी मंडळींनी तहसील कार्यालयाची कमानच जाहिरात फलक लावण्यासाठी वापरली आहे.जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळालेले तब्बल चारजण आहेत. ९९ टक्के गुण मिळविणारेही मोठ्या संख्येने आहेत. तर ९० टक्क्यांच्यावरील गुणवंतांची तर गणनाच नाही; पण या गुणवंतांचे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करत विद्रूपीकरण करणारे फलक लागलेले दिसले नाहीत.सातारा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या मंडलाधिकाऱ्याच्या मुलाचे कौतुक सोहळे भलत्याच पद्धतीने सुरू आहेत. येथील मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ यांचा मुलगा समिप याला दहावी परीक्षेत ९८.४० टक्के गुण मिळाले. याचे भले मोठे कौतुक समस्त तलाठी मंडळींना वाटले. आनंदाच्या भरात त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयाची कमानच फलक लावायला निवडली. इतक्या निवडणुका होतात, मंत्र्यांचे दौरे होतात; पण त्यांच्या स्वागताचे किंवा शुभेच्छांचे फलक कमानीवर कधी लागलेले दिसले नाहीत. इथे मात्र मंडलाधिकाºयाच्या मुलाच्या यशाचे भलतेच कौतुक कोण वर्णावे, असेच म्हणत उंचच्या उंच कमानीवर फलक लावला आहे.
तहसील कार्यालयात प्रवेश करत असतानाच कमानीवर लटकणारा भलामोठा फलक दिसतो. या फलकावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतानाचा फोटो आहे. आपल्या हस्ते झालेल्या सत्काराचा फोटो कमानीवर लागेल, याची कल्पना तरी जिल्हाधिकाऱ्यांनी केली असेल काय?, महसूल कर्मचाऱ्यांनी कसेही वागले तरी चालते, याच ठिकाणी सर्वसामान्याच्या मुलाचा फलक लागला असता तर तो प्रशासनाला सहन झाला असता का?, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच इतरांनाही फलक लावायला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
हे विद्रूपीकरण नाही काय? सार्वजनिक ठिकाणी फलक उभारून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. इथे तर शासकीय मालकीच्या कमानीवर फलक लावण्याचा प्रकार झाला आहे. याबाबत कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही.
ही कमान उंच आहे. शासकीय कमानीवर फलक लावण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने फलक लावणाºयांनी गे्रड सेपरेटरच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या हायवा ट्रक या ठिकाणी आणला होता. या हायवा ट्रकच्या टपावर चढून फलक लटकवण्यात आला आहे.
सातारा तहसीलदार कार्यालयाच्या कमानीवर लावलेला फलक.