शिष्यवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:53+5:302021-02-05T09:14:53+5:30
रामापूर : शिष्यवृत्ती हा शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्याला शिक्षण घेणे ...

शिष्यवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावाधाव
रामापूर : शिष्यवृत्ती हा शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्याला शिक्षण घेणे सुलभ होते. मात्र, शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांना दरवर्षी कागदपत्रांची जमवाजमव करताना धावपळ करावी लागते. ही धावपळ खर्चिक आणि त्रासदायक असते.
दरम्यान, विद्यार्थी व पालकांची ही धावपळ वाचविण्यासाठी आणि शालेय शिक्षणासाठी कायमस्वरूपी लागणारी विद्यार्थ्याची कागदपत्र सहज उपलब्ध होण्यासाठी शिक्षण आयडी क्रमांकाची संकल्पना सुरू करणे गरजेचे आहे. त्याबाबत एका कार्यशाळेत चर्चाही झाली आहे. मात्र, अद्याप शासन स्तरावर या संकल्पनेबाबत गांभीर्याने विचार झालेला नाही.
विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती, मागासवर्गीय शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, पुस्तक पेढी, दिव्यांग शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्ती अशा १८ प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असतात. या शिष्यवृत्तीच्या रकमेतून काही गरीब, होतकरू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत असते. मात्र, शिष्यवृत्तीसाठी शासकीय कार्यालयातून विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. ही कागदपत्र दरवर्षी काढावी लागत असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित विभाग दरवर्षी याबाबत नोटीस प्रसिद्ध करीत असतो. त्यामध्ये कोणत्या शिष्यवृत्ती आहेत, त्यासाठी कोणती पात्रता लागते, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती त्या नोटीसद्वारे पालकांना दिली जाते. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शासकीय कार्यालयात धाव घेतात. एका कागदासाठी वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नाही.
विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश देतानाच आधारकार्डप्रमाणे एखादा शिक्षण आयडी क्रमांक दिला तर जोपर्यंत संबंधित विद्यार्थी शिक्षण घेत आहे तोपर्यंत त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच पहिलीत स्वीकारलेली त्याची सर्व कागदपत्रे अखेरपर्यंत त्याच्या त्या शिक्षण आयडी क्रमांकावर कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. दरवर्षी कागदपत्रांसाठी धावाधाव करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास कमी होईल. हीच संकल्पना कऱ्हाडच्या गाडगे महाराज विद्यालयाच्या कार्यशाळेत प्रा. डॉ. विक्रमराव पाटील यांनी मांडली आहे. त्याबाबत सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे.
- चौकट
शिक्षण पूर्ण होईपर्यंत आयडी क्रमांकाचा उपयोग
पहिलीत प्रवेश घेताना विद्यार्थ्याला दिलेल्या शिक्षण आयडी क्रमांकाचा फायदा शासन पातळीवर होणार आहे. दरवर्षी तीच तीच कागदपत्रे काढण्याचा विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास बंद होईल. तसेच एका आयडी क्रमांकावर विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे राहतील. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासही त्याचा फायदा होईल. संबंधित विभागाचे शिष्यवृत्तीचे काम वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल. शिष्यवृत्तीचे उद्दिष्टही पूर्ण होईल. त्यामुळे युनिक आयडी क्रमांकाचा शासन पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.
- कोट
शिष्यवृत्ती ही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संजीवनी ठरत असते. शिष्यवृत्तीतून संबंधित विद्यार्थ्याला आपले शिक्षण पूर्ण करता येते. मात्र किचकट कागदपत्रांमुळे अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून आधारकार्डप्रमाणे मुलांना शिक्षण घेताना शिक्षण आयडी क्रमांक मिळावा. ज्यामुळे त्याला वारंवार कागदपत्रे काढण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. शासनाने याचा विचार करायला हवा.
- प्रा. डॉ. विक्रमराव पाटील
शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली