इंद्रायणीवरील पूल दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
By नितीन काळेल | Updated: June 16, 2025 19:38 IST2025-06-16T19:37:13+5:302025-06-16T19:38:01+5:30
धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणी खबरदारी

इंद्रायणीवरील पूल दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
नितीन काळेल
सातारा : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पर्यटनस्थळासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना युद्धपातळीवर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणीही खबरदारी घेण्याबाबत सूचना केलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात दिली.
सातारा शहराजवळील कोडोली जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी दुर्घटना घडली. यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुंडमळा येथील पूल जुना होता. तो रहदारीस प्रतिबंधित होता. तसेच सुटी असल्याने या पुलावर अधिकचा भार पडला. त्यामुळे पूल पडला ही वस्तुस्थिती आहे. आता यामधील जखमींवर चांगले उपचार व्हावेत यासाठी प्राधान्य देत आहोत. त्याचबरोबर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
राज्यात मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यातून अनेक शाळांनी बक्षिसे मिळविली. शाळा डिजिटल झाल्या असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस होता. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांत ऊर्जा, प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल.