करवाढीला जोरदार विरोध
By Admin | Updated: January 20, 2015 00:01 IST2015-01-19T22:45:42+5:302015-01-20T00:01:08+5:30
मलकापूर नगपंचायत : मूल्यवर्धित कर आकारणी ठरलाय कळीचा मुद्दा

करवाढीला जोरदार विरोध
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने लागू करण्यात आलेल्या मूल्यवर्धित कर आकारणी विरोधात अन्याय निवारण समितीने आक्रमक पवित्रा घेत सोमवारपासून नगरपंचायतीसमोर ठिय्या मांडला आहे़ ‘अन्यायकारक करवाढ रद्द झालीच पाहिजे’च्या घेषणा देत समितीच्या सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले़ मलकापूर शहरात मूल्यवर्धित कर आकारणी पद्धत व त्यामुळे झालेली करवाढ हा सध्या चांगलाच कळीचा मुद्दा बनला आहे़ नगरपंचायतीच्या या निर्णयाविरोधात अन्याय निवारण समितीने चांगलेच दंड थोपटले आहे़ करवाढ ही सन २०१५-१६ वर्षांपासून तीही नागरिकांना परवडेल, अशी लागू करावी़ सध्या केलेली करवाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसह आलेल्या शासनाच्या निधींचा हिशोब नागरिकांसाठी उपलब्ध करावा, १४ वर्षांतील जमा खर्चाचा तपशील नागरिकांसाठी प्रसिद्ध करावा, अशा विविध मागण्यांसाठी आज अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीसमोरच लाक्षणिक उपोषण करून निषेध केला. या उपोषणात समितीचे नेते अशोकराव थोरात यांच्यासह सुधाकर शिंदे, अंकुश जगदाळे, हनिफ मुल्ला अधिकराव शिंदे, संजय जिरंगे, दत्तात्रय शिंगण, सतीश माने, दादासाहेब येडगे यांच्यासह २५ ते ३० नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
संस्थांचा कोट्यवधींचा टॅक्स थकित
करवाढी विरोधात अन्याय निवारण समितीने आवाज उठवतानाच अनेक मिळकतींचा कर वसूल झालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याशिवाय कृष्णा रुग्णालय, इमरसन कंपनीसारख्या मोठ्या संस्थांचे कर येणे बाकी असल्याचे अशोकराव थोरात यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘हा टॅक्स वसूल करा, मगच करवाढ करा,’ अशी मागणीही थोरात यांनी केली.
भाजप, शिवसेनेचा पाठिंबा
भाजपचे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासह हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे या नगरसेवकांनीही उपोषणस्थळी भेट दिली. तसेच भोसले गटाच्या सहा नगरसेवकांनीही अन्याय निवारण समितीस पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर शिवसेनेचे नितीन काशीद यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एका अर्थाने भाजप व शिवसेनेचाही करवाढीला विरोध असल्याचे स्पष्ट झाले.