लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाने काही कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र हे निर्बंध केवळ नावालाच असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न समारंभ, अंत्यविधी, चित्रपटगृहे सगळीकडे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून नागरिकांना तर स्वतःची आणि इतरांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात रात्री नऊ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी आहे. मात्र अनेक दुकाने रात्री अकरा पर्यंत सुरू आहेत. तसेच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे मंगल कार्यालय हाऊसफुल होत आहेत. परवानगी घेताना ५० माणसांची घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात लग्न मंडपामध्ये २०० अधिक वर्हाडी मंडळी पाहायला मिळतात. गावातील विरोधकांनी पोलिसांना माहिती दिली तरच वऱ्हाडी मंडळींची प्रत्यक्ष संख्या समोर येत आहे. त्यानंतरच पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. हीच परिस्थिती अंत्यविधीलाही होत आहे. अंत्यविधी हा भावनेचा विषय असल्यामुळे या ठिकाणी जरी गर्दी झाली तरी प्रशासनाकडून नाइलाजास्तव दुर्लक्ष केले जात आहे. अंत्यविधीलाही जशी व्यक्ती असेल त्या पट्टीमध्ये गर्दी पाहायला मिळते. संगम माहुली घाटावरही सावडण्याचा विधीला तर रोज ७९ ते८० जणांचा जमाव आपल्याला पाहायला मिळतो.
चौकट: पहिल्या दिवशी २३ जणांवर कारवाई
जिल्हा प्रशासनाने पहिल्या दिवशी कठोर निर्बंध घातल्यानंतर सातारा शहरांमध्ये पहिल्या दिवशी २३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये काही जणांनी तोंडाला मास्क लावला नव्हता तर काही जणांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नव्हते. तसेच चार गुन्हे विवाह सोहळ्याचे दाखल झाले असून यामध्ये ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी उपस्थित असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईनंतर आठवडाभर मास्क मोहीम उघडण्यात आली मात्र त्यानंतर ही मोहीम सध्या थंडावली असल्याचे दिसून येत आहे.
कोठे काय आढळले
चित्रपट ग्रह
शहरातील चित्रपट ग्रहाला पूर्वीसारखी गर्दी नव्हती. केवळ महाविद्यालयातील युवक युतीच चित्रपटगृहाबाहेर रेंगाळत होते. कोरोनामुळे चित्रपट व्यवसायावरही कुऱ्हाड कोसळली आहे. शहरातील बसस्थानका समोर असलेल्या चित्रपट घरासमोर काही युवक रेंगाळत होते. या युवकांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. हीच परिस्थिती या परिसरातील व्यावसायिकांचे आहे. काही व्यवसायिक काटेकोर पालन करत आहेत तर काही जणांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
विवाह समारंभ :
शहरातील काही मोजक्याच ठिकाणी विवाह समारंभासाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या गतं दोन दिवसात विवाहाचा मुहूर्त नसल्यामुळे मंगल कार्यालय ओस पडली होती. मात्र गत आठवड्यात विसावा नाका परिसरात 2 विवाह पार पडले. यावेळी मात्र कार्यालयात तुडुंब गर्दी असल्याचे पाहायला मिळाले होते. पुढील आठवड्यात विवाह सोहळ्याचा मुहूर्त असून यावेळी प्रशासनाने या विवाह सोहळ्यावर विशेष नजर ठेवणे गरजेचे आहे.
अंत्यविधी :
अंत्यविधी ही भावनिक बाब असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र दुःखी परिवार आणि सहभागी झालेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने उद्यापर्यंत यावर निर्बंध घातले असले तरी कारवाई मात्र केली नसल्याचे पाहायला मिळते. शहरात एखादी प्रतिष्ठित व्यक्ती निधन झाल्यानंतर त्यांच्या घराभोवती नागरिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. हीच परिस्थिती सावडणे विधीलाही होत आहे. संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे फारसे नियमाला महत्त्व दिले जात नाही.
कार्यालय:
शासकीय कार्यालयामध्ये अनेक जण काटेकोरपणे नियम पाळत आहेत. शासनाकडून नागरिकांना निर्बंध घातले जात असताना आपण नियम पाळले पाहिजेत याची जाणीव प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला असल्याचे पाहायला मिळते. तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर वारंवार शासकीय कार्यालयात होत असल्याचे दिसून येते. कोरोनापासून कसा बचाव करावा, याचे सूचनाफलकही शासकीय कार्यालयात पाहायला मिळतात.
ग्रह विलगीकरण
सध्या कोरोनाची संख्या वाढत असल्याने अनेक जण कोरोना येत आहेत. गतवर्षी रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे यंदा अनेकजण बाधित असूनही घरांमध्ये उपचार घेत आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार असलेला फलक आपल्या दरवाजावर लावत नाहीत. आपण बाधीत आहे हे इतरांना समजू नये याची अनेक जण काळजी घेत आहेत खरंतर दरवाजावर चौदा दिवस विलीनीकरण असा बोर्ड लावणे सक्तीचे आहे परंतु याकडे अनेक जण सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.